|| जयेश शिरसाट

कंत्राटदार राजू शिंदे यांची हत्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील गुन्हेगारीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. शिंदे यांच्या हत्येनंतर चित्रनगरी आपल्या कब्जात ठेवण्यासाठी संघटित टोळ्या निर्माण झाल्या. नेपथ्य उभारणीतील विविध कामांचे कंत्राट आपल्याला किंवा मर्जीतील व्यक्तीला मिळवून देण्यासाठी या टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हयात असेपर्यंत येथील बहुतांश कंत्राटे त्यांनाच मिळत. त्यातील काही ते स्वत: पूर्ण करत तर उर्वरित इतरांना वाटत. २०१५ मध्ये चित्रनगरीत त्यांची हत्या करण्यात आली. ते बालाजी स्टुडिओ जवळ बसलेले असताना हल्लेखोराने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र चित्रनगरीतील कंत्राटे मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. वरचढ ठरण्यासाठी काहींनी अंडरवर्ल्डमधील सराईत गुंडांचा आधार घेतला तर काहींनी राजकीय पक्षांचा. प्रत्येक कंत्राटामागे २० ते २५ टक्के दलाली मिळवण्यासाठी टोळ्या निर्माण झाल्या.

कंत्राट न मिळाल्यास सेटवर जाऊन निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकारांना धमकावणे, हुल्लडबाजी करून काम बंद पाडणे, जळती लाकडे घेऊन सेटवर जाणे आणि सेट जाळण्याची धमकी देणे, तोडफोड करणे आदी प्रकार सुरू झाले. त्याने उपाय न झाल्यास ज्याला कंत्राट मिळाले त्याला धमकावण्यास सुरुवात झाली. त्याच्याकडे काम करणाऱ्या मजुरांना फितवून काम बंद पडले जाऊ लागले. या प्रकारामुळे नेपथ्य उभारणीस विलंब होऊ लागला. त्याचा आर्थिक भार नेपथ्यकारावर येऊ लागला. मालिका-चित्रपटांचे चित्रीकरण लांबू लागल्याने निर्माते, दिग्दर्शक अडचणीत येऊ लागले.

शिंदे यांच्या हत्येनंतर हे प्रकार वाढलेच, पण चित्रनगरीत उपस्थित टोळ्यांमध्ये गँगवॉर सुरू झाले. त्यातून हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, दंगल आदी गुन्हे नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद होऊ लागले.

कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चित्रीकरण सुरू असेल त्या ठिकाणी गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय निर्माते, दिग्दर्शक आदींचा एक व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करून त्यात आरे, मढ, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना सहभागी करून घेण्याची सूचना केली. हा समूह तयार होताच अडवणूक करणाऱ्या प्रत्येकाविरोधात तक्रार करता येईल आणि त्याक्षणी पोलीस तेथे पोहचून कारवाई करू शकतील.