Aamir Khan and Shah Rukh Khan Video Viral : आमिर खान, शाहरुख खान व सलमान खान यांनी नुकतीच रियाधमधील जॉय फोरम २०२५ मध्ये हजेरी लावली. शाहरुख खान, सलमान खान व आमिर खान यांनी एकत्र स्टेज शेअर केला. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर खान गाणे गात आहे; तर शाहरुख खान आणि सलमान खान बॅकग्राउंड डान्सर म्हणून नाचत आहेत. काही लोक असा दावा करीत आहेत की शाहरुख खानने आमिर खानला गाणे गात असताना अडवले आणि ही गोष्ट आमिर खानला आवडली नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान, आमिर खान व सलमान खान एकाच स्टेजवर बसलेले आहेत. शाहरुख खान म्हणतो की, आमिर खान गाणार आहे, तर तो आणि सलमान खान बॅकग्राउंडला डान्स करतील. शाहरुख खानची ही गोष्ट ऐकल्यानंतर आमिर खान म्हणतो, “काय मजा करीत आहेत?”

आमिर खानने गायलं गाणं

दरम्यान, शाहरुख खान आणि सलमान खान आमिर खानच्या मागे उभे असतात. आमिर खान त्याला विचारतो की, त्याने कोणते गाणे गावे? सलमान आणि शाहरुख खान म्हणतात की, तुला जे आवडेल ते गाणे म्हण. आमिर खान अनोखी रात (१९६८)मधील ‘ओ रे ताल मिले नदी के जल में’ गातो. आमिर खान गाण्याच्या दोन ओळी गातो आणि मग शाहरुख खान मागून प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्याचा इशारा करतो. त्यानंतरही आमिर गाणे गाणे सुरू ठेवतो जेव्हा शाहरुख खान गाण्यात अडथळा आणतो आणि प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास सांगतो व म्हणतो शास्त्रीय गायन शिकल्यानंतर आमिरचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे, तोही सौदीमध्ये.

जेव्हा शाहरुख खान त्याला अडवतो तेव्हा आमिर खान मागे वळतो, त्याच्याकडे बघून हसतो आणि नंतर मान हलवतो. या व्हिडीओवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “शाहरुखने आमिरला अडवले; तो आणखी गाणे गाऊ इच्छित होता.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “शाहरुखच्या कृतीने आमिर आश्चर्यचकित झाला आहे.” एकाने कमेंट केली, “शाहरुखने असे अडवायला नको होते. हे चुकीचे आहे.”