Shah Rukh Khan Diwali Party : शाहरुख खान दरवर्षी ‘मन्नत’मध्ये दिवाळी पार्टी आयोजित करतो, ज्यामध्ये अनेकदा अनेक प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित राहतात. परंतु, यावेळी किंग खान ‘मन्नत’मध्ये दिवाळी पार्टी आयोजित करणार नाही. त्यामागील मुख्य कारण उघड झाले आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने पुष्टी केली आहे की, शाहरुख खान या वर्षी दिवाळी पार्टी आयोजित करणार नाही. त्यामागील कारण म्हणजे ‘मन्नत’मध्ये बऱ्याच काळापासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ही बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्याचे चाहते थोडे निराश झाले आहेत.

शाहरुख खान भाड्याने राहत आहे

शाहरुख खान सध्या मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल परिसरात एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये त्याची पत्नी गौरी खान आणि मुले आर्यन, सुहाना व अबराम यांच्याबरोबर राहत आहे. त्याच्या घराचे ‘मन्नत’चे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर तो तिथेच स्थलांतर करील. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनय, स्टाईलने जितका चर्चेत असतो, तितकीच त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याचीसुद्धा चर्चा होताना दिसते.

शाहरुख खान दिवाळी पार्ट्यांसाठी का प्रसिद्ध आहे? चला तर मग यामागील कारण जाणून घेऊ. अभिनेता त्याच्या पार्टीत सर्वांबरोबर त्याचा फोटो काढतो. त्याशिवाय पार्टी संपल्यानंतर तो स्वतः सर्वांना बाहेर सोडायला जातो.

पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पापाराझींना शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीचे फोटो मिळत नाहीत. कारण या पार्टीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असते. हो, शाहरुख खान पार्टीनंतर बाहेर पडतो आणि पापाराझींसाठी पोज देतो.

शाहरुख खानव्यतिरिक्त, आणखी एक असा अभिनेता आहे, जो यावेळी दिवाळी पार्टी आयोजित करणार नाही. तो दुसरा-तिसरा कोणी नसून आयुष्मान खुराना आहे. हा अभिनेता सध्या त्याच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थामा’च्या प्रदर्शनाची तयारी करीत आहे.

शाहरुख खान केवळ त्याच्या अभिनय आणि चित्रपटांसाठीच नव्हे, तर इंडस्ट्रीत शानदार पार्ट्या आयोजित करण्यासाठीही ओळखला जातो. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शाहरुख शेवटचा ‘डंकी’मध्ये दिसला होता. शाहरुख खानचा आगामी ‘किंग’ हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन व सुहाना खान यांचाही समावेश आहे.