Ranya Rao was allotted land by Karnataka govt : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याची तस्करी करताना विमानतळावर पकडण्यात आलं. रान्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू (डीआरआय) यांच्याबरोबरच आता सीबीआयदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

आता कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्डाने (KIADB) दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन बसवराज बोम्मई सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये स्टील प्लांट कंपनी तयार करण्यासाठी रान्या रावला जमीन दिली होती. केआयएडीबीने रान्याशी संबंधित कंपनीला १२ एकर औद्योगिक जमीन दिल्याच्या वृत्तावर बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे.

रान्या राव प्रकरणात राजकीय वळण येण्याची शक्यता असल्याने मंत्री एम.बी.पाटील यांच्या कार्यालयाने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी तुमकुरू जिल्ह्यातील सिरा औद्योगिक क्षेत्रातील जमीन रान्याच्या क्षीरोदा इंडिया कंपनीला देण्याबाबत सरकारची अंतिम अधिसूचना शेअर केली आहे. त्यावेळी राज्यात भाजपाचे सरकार होते. मे २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती.

कंपनी सुरू केल्यावर अवघ्या काही महिन्यांत मिळाली जमीन

कंपनी सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच रान्याला सरकारी जमीन मिळाली. तिने २१ एप्रिल २०२२ रोजी कंपनीची नोंदणी केली होती आणि २ जानेवारी २०२३ रोजी तिला १२ एकर जमीन मिळाली. अनेक मोठ्या कंपन्यांना केआयएडीबीकडून जमीन मिळण्यास अनेक वर्षे लागतात, पण रान्या रावला काही महिन्यातच जमीन मिळाली. आता डीआरआय अधिकारी रान्याच्या कंपनीचे शेअर्स, महसूल आणि बँक खाती तपासत आहे.

१३० कोटी रुपयांची गुंतवणूक

“क्षीरोदा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला तुमकुरू जिल्ह्यातील सिरा औद्योगिक परिसरात स्टील उत्पादनं – टीएमटी बार, रॉड आणि संबंधित उत्पादनांच्या निर्मितीसाठी युनिट स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. १३८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मान्यता देताना सरकारला आनंद होत आहे, यामुळे जवळपास १६० लोकांना रोजगार मिळेल,” असं त्या प्रसिद्धीपत्रकात लिहिलं आहे.

रान्या रावला दिली १२ एकर जमीन

मंत्र्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केआयएडीबीने म्हटलंय की रान्या रावच्या कंपनीला जानेवारी २०२३ मध्ये जमीन देण्यात आली होती. क्षीरोदा इंडियाला तत्कालीन सरकारने २ जानेवारी २०२३ रोजी १२ एकर जमीन दिली होती, असं केआयएडीबीचे सीईओ महेश यांनी सांगितलं.

रान्याच्या फोनमध्ये काय आढळलं?

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी रान्या रावच्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपमधून डेटा रिकव्हरी केली आहे. त्यानुसार, तिच्या फोनमध्ये अनेक राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर सापडले आहेत. यामध्ये सरकारच्या विद्यमान व माजी सरकारच्या मंत्र्यांचाही समावेश आहे.

रान्या रावला बंगळुरू विमानतळावर झाली अटक

रान्याला मागील आठवड्यातील सोमवारी रात्री बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईतून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिच्याजवळ १५ किलो सोनं आढळलं. या सोन्याची किंमत जवळपास १२.५६ कोटी रुपये आहे. रान्या राव ही कर्नाटकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीआरआय अधिकाऱ्यांनी रान्याच्या घरी घेतलेल्या झडतीत २.६ कोटी रुपयांचे दागिने, २.६७ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे.