राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला. त्यानंतर आता चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ‘आरआरआर’ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली आहे. याबरोबरच जगभरातील दिग्गज कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात पडली आहेत. हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनीदेखील राजामौली यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. जेम्स कॅमेरून राजामौली आणि संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी यांच्याशी ‘आरआरआर’बद्दल भरभरून बोलले.
‘आरआरआर’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ नुकताच पोस्ट करण्यात आला आहे. यात जेम्स कॅमेरून आणि त्यांची पत्नी राजामौली यांच्या चित्रपटाबद्दल भरभरून बोलताना आणि कौतुक करताना दिसत आहे. शेवट संभाषण संपवताना जेम्स कॅमेरून यांनी राजामौली यांच्यासमोर एक प्रस्तावदेखील ठेवला. जेम्स कॅमेरून राजामौली यांच्या कानात बोलले की, “तुम्हाला जर इथे चित्रपट बनवायचा असेल, तर मला सांगा आपण नक्कीच चर्चा करू.”
जेम्स कॅमेरून यांच्याकडून होणारं कौतुक पाहून राजामौली चांगलेच भारावून गेले. ‘आरआरआर’ हा चित्रपट यंदाच्या वर्षी ऑस्करसाठी नक्कीच निवडला जाऊ शकतो. साऱ्या जगभरातून या चित्रपटावर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. जपानमध्ये तर या चित्रपटाने रजनीकांत यांच्या चित्रपटाचा रेकॉर्डही मोडीत काढला आहे. जागतिक पातळीवर या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाच्या ऑस्करवारीसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत.