२०२२ हे वर्ष संपायला अवघे १५ ते २० दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाची चाहूल लागल्यानंतर प्रत्येक घराघरात नव्या दिनदर्शिकेबद्दल चर्चा रंगू लागतात. आपल्याकडे दिनदर्शिका म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कालनिर्णय. सणांची माहिती, नामवंत लेखकांचे लेख, पाककृती, आरोग्य, पंचांग अशा विविध सदरांची माहिती कालनिर्णयमध्ये अगदी सोप्या भाषेत दिलेली असते. भिंतीवर कालनिर्णय असावे ही जाहिरात आता सर्वांनाच तोंडपाठ झाली आहे. मात्र आता कालनिर्णयने नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
कालनिर्णय दिनदर्शिका ही महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दिनदर्शिका आहे. रोजचे पंचांग, महत्त्वाचे दिनविशेष सोप्या भाषेत यात नमूद केलेल्या असतात. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक मागील पानावर नामांकित लेखकांचे लेख, स्वयंपाक टिप्स, रेल्वे वेळापत्रक, मासिक राशिभविष्य, इत्यादी वाचता येते. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ही कालनिर्णय दिनदर्शिका घराघरात लोकप्रिय ठरली.
आणखी वाचा : “लॅम्बोर्गिनी आणि फेरारी म्हणजे प्रेम नव्हे तर…” क्रांती रेडकरने समीर वानखेडेंसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
गेल्या अनेक वर्षांपासून कालनिर्णयच्या विविध जाहिराती प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झाल्या आहेत. यात भिंतीवर कालनिर्णय असावे, अहो कालनिर्णय द्या ना, कालनिर्णय घ्या ना अशा अनेक जाहिराती आजही चर्चेत असतात. यात अनेक दिग्गज कलाकार झळकले होते. त्यानंतर आता कालनिर्णय दिनदर्शिकेने आता कालनिर्णय द्या ना ही जाहिरात पुन्हा एकदा नव्या रुपात आणली आहे.
या जाहिरातीत सायली संजीव, समीर चौगुले, पूजा साळवी, उर्वी सिंग हे कलाकार झळकत आहे. यात अभिनेता समीर चौगुले हा कालनिर्णय विक्रेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर सायली संजीव, पूजा साळवी हे कलाकार कालनिर्णय खरेदी करत असताना पाहायला मिळत आहे. यात हे कलाकार मराठी, गुजराती आणि हिंदी भाषेत संवाद साधताना दिसत आहेत. टिळक शेट्टी यांनी ही जाहिरात दिग्दर्शित केली आहे. ही जाहिरात पाहून अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दरम्यान ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांनी १९७३ साली कालनिर्णय दिनदर्शिका प्रकाशित केली होती. त्यानंतर पुढे तब्बल ९ भाषांमध्ये ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येऊ लागली. त्यानंतर एकट्या मराठी भाषेतील कालनिर्णयचा खप ४८ लाखांपर्यंत जाऊन पोहोचला. कालांतराने कालनिर्णय हा आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून नावारूपाला आला.