दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच अभिनेते एका अडचणीत सापडले आहेत. एका विधानामुळे कमल हासन चांगलेच अडचणीत आले आहेत. कमल हासन यांनी ‘कन्नड भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली’ असं विधान केलं होतं आणि त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र रोष पाहायला मिळत आहे.

या सगळ्यानंतर कमल हासन यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. कमल हासन यांच्या राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेने मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात माहिती दिली की, अभिनेते त्यांच्या कन्नड भाषेबद्दलच्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) बरोबर चर्चा करेल.

याबद्दल ‘ठग लाईफ’ प्रॉडक्शन हाऊसचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील म्हणाले, “कमल हासन यांनी दिलेल्या विधानाच्या आधारे ‘ठग लाईफ’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. मी संपूर्ण विधान पाहिले आहे. कन्नड चित्रपटाचे सुपरस्टार शिवराजकुमारदेखील कार्यक्रमात उपस्थित होते. कमल हासन यांच्या विधानाला कन्नड भाषेविरुद्ध बोलणं काही योग्य नाही.”

कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा अद्याप प्रलंबित असल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती याचिकाकर्त्याच्या वकिलाने केली. या विनंतीवर उच्च न्यायालयाने सुनावणी १० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान, यापूर्वी उच्च न्यायालयाने कमल हासन यांना विचारले होते की, कन्नड भाषा तमिळ भाषेतून आली आहे असे म्हटल्याबद्दल ते भाषातज्ज्ञ आहेत का? न्यायालयाने त्यांना माफी मागण्यासही सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर न्यायालयाने सांगितलं की, जर कमल हासन माफी मागू शकत नाहीत तर मग कर्नाटकात त्यांना त्यांचा सिनेमा कशाला चालवायचा आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग कुणीही इतर लोकांच्या भावना दुखावण्यासाठी करु शकत नाही. चित्रपट प्रदर्शित करायला हवा की नाही याबाबत तूर्तास न्यायालयाने काही म्हटलेलं नाही. कमल हासन यांनी माफी मागण्याबाबत फेरविचार केला पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं.