‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो सगळ्यांना खळखळून हसवतो. या शो मधील कपिल शर्मा हा विनोदी कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या विनोदाचे आणि अभिनयाचे अनेक कलाकार चाहते आहेत. छोट्या पडद्यावर एक विशेष ओळख निर्माण केलेला कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सवर स्टँडअप कॉमेडी करणार आहे. कपिल शर्माच्या नवीन शो Kapil Sharma I’m Not Done Yet चा ट्रेलर नुकतच रिलीज झाला. यात तो पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवताना दिसत आहे.
यापूर्वी कपिल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्वीट केले होते. यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. कपिलने त्याच्या नेटफ्लिक्सवरील स्टँडअप कॉमेडी शो मध्ये याबद्दलचा उल्लेख करत मोदींची खिल्ली उडवली आहे. “अमृतसरमध्ये तीन गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. पहिले वाघा बॉर्डर, दुसरे सुवर्णमंदिर आणि तिसरे या दोघांच्यामध्ये उभे असलेले छोले-कुलचे विकणारे. या छोले-कुलचे विकणाऱ्या विक्रेत्यांच्या मनात फक्त एकाच गोष्टीची भीती सतत असते की अचानक कोणी रात्री ८ वाजता येईल आणि मित्रों… म्हणत त्यांच्या छोले-कुलचेची विक्री बंद करेल”. असे कपिल यावेळी म्हणाला.
कपिलचे हे बोलणे ऐकून प्रेक्षक जोरजोरात हसायला लागतात. त्यासोबत फार टाळ्याही वाजवतात. विशेष म्हणजे मोदींबद्दल हा किस्सा सांगताना कपिल हा पंतप्रधान मोदींच्या आवाजाची हुबेहुब नक्कलही करतो.
प्रसाद ओकने लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त पत्नीला दिली ‘प्रेमाची भेट’, म्हणाला…
कपिल शर्माच्या या नव्या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या नव्या शोच्या ट्रेलरमध्ये कपिल शर्मा त्याची अनेक गुपिते उघड करताना दिसत आहे. यावेळी द कपिल शर्मा शोची संपूर्ण टीम आणि त्याचे कुटुंबही उपस्थित असल्याचे दिसत आहे. कपिलचा हा नवा शो येत्या २८ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.