Kareena Kapoor Birthday : करीना कपूर आज (२१ सप्टेंबर) तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या अनोख्या स्टाईलने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. २००० मध्ये जेपी दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बेबोने आता चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेत्रीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

अभिषेक बच्चनबरोबर ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर करीना कपूरने कधीही मागे वळून पाहिले नाही. करीनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’चा समावेश आहे. या चित्रपटातील तिची ‘पू’ ही भूमिका अजूनही संस्मरणीय आहे. तिच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘जब वी मेट’, ‘ओमकारा’, ‘कुर्बान’, ‘उडता पंजाब’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गुड न्यूज’, ‘वीरे दी वेडिंग’ व ‘क्रू’ यांचा समावेश आहे.

करीना कपूरने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अडीच दशकांच्या कारकिर्दीत तिने चित्रपट आणि जाहिरातींद्वारे भरपूर पैसे कमावले आहेत. ‘न्यूज१८’नुसार २०२५ पर्यंत करीना कपूर-खानची एकूण संपत्ती ४८५ कोटी रुपये आहे.

‘इंडिया टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, तिची अभिनय कारकीर्द हा तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. अभिनेत्री प्रत्येक चित्रपटासाठी १०-१२ कोटी रुपये घेते, असे म्हटले जाते. त्याशिवाय ती ब्रँड डीलमधूनही कमाई करते, ज्यापैकी एका जाहिरातीसाठी तिला सुमारे ५ कोटी रुपये मिळतात. करीना कपूर-खान तिच्या ग्लॅमर आणि लूकमुळे तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. ती तिच्या सौंदर्य आणि फिटनेसकडे बारकाईने लक्ष देते. तिचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात.

करिना आणि तिचा पती सैफ अली खान हे त्यांची दोन्ही मुले तैमूर आणि जेह यांच्यासह मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान घरात राहतात. ‘जीक्यू इंडियाच्या’ मते, या मालमत्तेची किंमत सुमारे १०३ कोटी रुपये आहे. त्याव्यतिरिक्त या जोडप्याकडे प्रसिद्ध पतौडी पॅलेस आहे, ज्याची किंमत ८०० कोटी रुपये आहे. करीनाकडे बऱ्याच लक्झरी कारही आहेत. त्यामध्ये ऑडी क्यू 7 एन एसयूव्ही आहे, ज्याची किंमत ८८ ते ९५ लाख आहे. तसेच तिच्याकडे बीएमडब्लू एक्स, मर्सिडीज बेंझ एस क्लास या गाड्याही आहेत. तसेच तिला लक्झरी बॅग्जचीही आवड आहे.

करीना शेवटची रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटात तिने अवनी कामतची भूमिका केली होती. तसेच, ‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर व जॅकी श्रॉफ यांसारख्या कलाकारांनीही काम केले होते.