स्टार प्लस वाहिनीवरील ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ या मालिकेला २००२ ते २००९ या काळात बरीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. एकता कपूरच्या या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री जूही परमार. जुही या नावापेक्षा कुमकुम म्हणूनच तिला ओळखलं जाऊ लागलं. ‘मिस राजस्थान’चा किताब पटकावणाऱ्या जुहीने २००९ मध्ये गुजराती व्यावसायिक आणि अभिनेता सचिन श्रॉफशी प्रेमविवाह केला. ‘पती पत्नी और वो’, ‘नच बलिये’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी एकत्र भाग घेतला आणि टेलिव्हिजनची ही जोडी सर्वांनाच आवडू लागली. आठ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर ही जोडी आता विभक्त होण्याच्या वाटेवर आहे.
एका टीव्ही शोच्या सेटवर या दोघांची एकमेकांशी ओळख झाली. पहिल्याच नजरेत प्रेम व्हावं असं काही या दोघांमध्ये झालं नाही. सहकलाकार म्हणून मैत्री झाली आणि पाच महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सर्व ठीक होतं. पण, जसजसा काळ लोटत गेला तसं त्यांच्यात छोटे-मोठे वाद होऊ लागले. ‘माझ्या व्यग्र वेळापत्रकामुळे घराकडे मी जास्त लक्ष देऊ शकत नाही, पण माझ्या प्रत्येक कामात मला जुहीची साथ मिळते. मात्र तिची एकच गोष्ट मला आवडत नाही, तो म्हणजे तिचा राग. लहानसहान गोष्टींवरून ती खूप रागावते आणि माझा स्वभाव याच्याविरुद्ध आहे,’ असं सचिनने ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. तर सचिनच्या विसरण्याच्या सवयीचा मला खूप राग येतो, असं जुही सांगते. कदाचित याच लहानसहान गोष्टींचा त्याच्या नात्यावर परिणाम झाला असावा.
https://www.instagram.com/p/BDXfOSqBdVd/
वाचा : जेव्हा मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टमध्ये सलमानने अर्पिताला खांद्यांवर उचलून घेतलेलं
लग्नापूर्वीही एका क्षुल्लक गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाला आणि या वादामुळे एक वर्षासाठी दोघांनी अबोला धरल्याचं जुहीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. चित्रपट पाहण्यासाठी सचिन उशिरा आल्याने जुहीचा राग अनावर झाला आणि त्यानंतर ते दोघं एकमेकांशी बोललेच नाहीत. अखेर एका वर्षानंतर पुन्हा संवाद सुरु करण्यासाठी सचिननेच पुढाकार घेतला.
https://www.instagram.com/p/e4asPthdVd/
लग्नानंतरही अशाच छोट्या-मोठ्या वादांमुळे दोघांमुळे दुरावा निर्माण झाला. गेल्या वर्षभरापासून हे दोघं वेगळे राहत आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार जुही लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे.