सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेच्या मुंबई आणि परिसरातील १६ शाखेच्या उद्योजकांमध्ये क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. सॅटर्डे क्लब क्रिकेट लीग (एससीसीएल) या नावाने ही क्रिकेट स्पर्धा शनिवार, ५ मे रोजी भांडुप (प) येथील प्रमोद महाजन क्रीडांगणावर होणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध अभिनेता संदीप कुलकर्णी हा देखील या स्पर्धेत खेळणार आहेत.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही ना नफा ना तोटा या तत्वाने चालणारी संस्था आहे. या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रात ४२ च्या आसपास शाखा असून तब्बल १५०० हून अधिक सदस्य आहेत. यातील १६ शाखेचे १७६ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे. प्रत्येक संघात ११ खेळाडू असून यामध्ये २ महिलांचा देखील समावेश असेल. विजयी संघाला सॅटर्डे क्लब क्रिकेट लीग चषक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. यावेळी श्वास फेम संदीप कुलकर्णी यांचे चौकार- षटकार प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहेत.

सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रीयन उद्योजक उत्तम पद्धतीने व्यवसाय करीत आहोत. क्रिकेटच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांना एकत्र आणून त्यांच्यातील भावबंध घट्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे, अशी या स्पर्धेमागची भावना एससीसीएलचे संयोजक स्वरुप दासन यांनी व्यक्त केली.