‘कुंकू’ मालिकेमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या मृण्मयीचा आज ( २९ मे ) वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून मृण्मयीवर आज शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मृण्मयीची धाकटी बहीण व लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील मजेशीर पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गौतमी या व्हिडीओमध्ये मृण्मयीला म्हणते, “ताई तू डोळ्यातून मुद्दाम पाणी आणत आहेस…खोटं बोलतेयस माझ्याशी…हो ना? नौटंकी…सांग काय हवंय तुला?” यावर मृण्मयी “मला मसाज करून हवाय” असं उत्तर देते.

गौतमीने मसाज करून देण्यास नकार दिल्यावर मृण्मयी तिला सांगते, “चालेल मी इथून निघून जाते. शंभर घरं आहेत माझ्याकडे…” यावर गौतमी तिला म्हणते, “कुठे शंभर घरं आहेत…इथेच येतेस ना फायनली.” शेवटी गौतमी चेष्टा करत बहिणीला निघून जा असं सांगते.

यानंतर मृण्मयी तिला म्हणते, “एकदा मी पाऊल बाहेर टाकलं की, मी परत येणार नाही हा गौतमी…बघ मी पाऊल बाहेर टाकलं की, तू माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच नसशील…” धाकट्या बहिणीला हे सांगत असताना मृण्मयी काहिशी हसते एवढ्यात गौतमी तिला खेचून पुन्हा घरात घेते.

देशपांडे सिस्टर्सचं हे बॉण्डिंग चाहत्यांना प्रचंड आवडतं. “हॅप्पी बर्थडे ताई…नौटंकी कमी कर आणि कधीतरी माझे पण लाड कर” असं भन्नाट कॅप्शन गौतमीने या व्हिडीओला दिलं आहे.

गौतमीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत या दोघींच्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे. तसेच नेटकऱ्यांनी मृण्मयीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या दोघी बहिणी नुकत्याच एकत्र ‘स्टार प्रवाह’च्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात झळकल्या होत्या. गौतमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘माझा होशील ना’ या मालिकेद्वारे तिने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. सध्या ती ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.