महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला अशोक सराफ, त्यांच्या पत्नी निवदेता, त्यांचे भाऊ अशी सर्व जवळची मंडळी उपस्थिती होती. मात्र, अशोक सराफ यांचा लेक या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.

अशोक सराफ यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्राशी संवाद साधताना याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते म्हणाले, “पद्मश्री पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुखावणारा व आनंदाचा दिवस होता. आपण आजवर केलेल्या कामाचं कौतुक अशाप्रकारे सरकार दरबारी व्हावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते आणि तो क्षण मी प्रत्यक्ष जगलो.”

अभिनेते पुढे म्हणाले, “या सोहळ्याला माझी पत्नी निवेदिता, माझा भाऊ, पुतण्या, साडू अशी सर्व जवळची मंडळी उपस्थित होती. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि प्रेक्षकांचं प्रेम यामुळे मला इथवरचा प्रवास करता आला. मी महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानतो. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहू द्या”

अशोक आणि निवेदिता यांच्या मुलाचं नाव अनिकेत सराफ असं आहे. करिअर करण्यासाठी त्याने आपल्या आई-वडिलांपेक्षा वेगळी वाट निवडली. अनिकेत हा शेफ आहे. आई निवेदिता यांच्यामुळे त्याला लहानपणापासून स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. अनिकेतने त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये पूर्ण केलं आहे. तो भारतीय तसेच पाश्चिमात्त्य पदार्थ सुद्धा बनवतो. निक सराफ या नावाने तो सोशल मीडियावर सक्रिय आहे.

अनिकेतने पद्मश्री पुरस्कार सोहळ्याला उपस्थितीत राहावं अशी सर्वांची आणि त्याचीही इच्छा होती, मात्र त्याला सुट्टी मिळाली नाही, त्यामुळं तो येऊ शकला नाही, असंही अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदा राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शहा, एस. जयशंकर, प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह, जी. किशन रेड्डी आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.