Zapuk Zupuk Movie New Poster : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. ३० मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्तानं डोबिंवलीत झालेल्या शोभायात्रेत सूरज चव्हाण पाहायला मिळाला. यावेळी तो ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसला. त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये सूरजसह झळकणारी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.
डिसेंबर २०२४ मध्ये ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला होता. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. त्यामुळे आता केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. २५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं नवं पोस्टर ’जिओ स्टुडिओ’नं सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
“टॉपचा किंग आलाय पिक्चरमधल्या सगळ्यांना घेऊन… आता २५ एप्रिलपासून अख्खं थिएटर हादरणार… तयार राहा. कारण- हा पिक्चर एकदम ‘झापुक झुपूक’ असणार. ‘नाही तर बुक्कीत टेंगुळ‘, अशी कॅप्शन लिहीत ‘जिओ स्टुडिओ मराठी’च्या इन्स्टाग्रामवर ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सूरजसह अभिनेता इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार दिसत आहेत.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं हे नवं पोस्टर सध्या चर्चेत आलं आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या नव्या पोस्टरवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी चित्रपटासाठी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून, या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं.
