अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. पण गेल्या काही महिन्यात त्याला कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पण आता यावर त्याने त्याची भूमिका मांडली आहे.
सुबोध गेले काही दिवस त्याच्या ‘फुलराणी’ या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या निमित्ताने सध्या तो अनेक मुलाखती देताना दिसत आहे. ‘सेलिब्रिटी कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला गेला असता त्याने त्याची बाजू स्पष्ट केली.
आणखी वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…
“आपण चांगलं काम केल्यावरही नकारात्मक कमेंट्स करणाऱ्यांना तू काय सांगशील?” असं विचारल्यावर तो म्हणाला, “मी त्यांना काहीही सांगायला जाणार नाही. कारण तेवढी त्यांची पात्रता नाही की मी त्यांना काहीतरी सांगावं. आपण रस्त्यावरून जाताना कुत्री भुंकायला लागतात आणि सतत जर ती भुंकायला लागली तर ती डोक्यात जातात. त्यामुळे कधीतरी तुम्हाला तुमच्या हातात दगड घ्यावा लागतो ज्यामुळे ती शांत होतात.”
पुढे तो म्हणाला, “जे माझ्या कामावर टीका करतात त्यांच्यावर माझं प्रेम आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात राग नाही. ज्यांना माझं काम अजिबात आवडत नाही त्यांच्याविषयीही माझ्या मनात प्रेम आहे. पण जे कारण नसताना आपण करत असलेल्या कामामध्ये त्यांची नकारात्मकता घेऊन येतात ती लोकं माझ्या डोक्यात जातात. मी खूप शांत बसायचं ठरवलं होतं पण आता नाही. आता त्यांना ज्या भाषेत समजेल अशाच भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल.”
हेही वाचा : बिरबलाच्या भूमिकेतील फर्स्ट लूकमुळे सुबोध भावे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अरे देवा…”
दरम्यान ‘फुलराणी’ या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.