‘सोनपरी’सारख्या अजरामर भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहिनी घालणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. गेली अनेक वर्षे मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीतून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट, तसंच जाहिरातींमधूनही त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. मृणाल यांची ४० ते ४५ वर्षांची अशी प्रदीर्घ कारकीर्द आहे.
अभिनयाबरोबरच मृणाल यांच्या मनमोहक सौंदर्याचेही तितकेच चाहते आहेत. वयाच्या पन्नाशीतही अनेक तरुणींना लाजवेल असा त्यांचं सौंदर्य आहे. या वयातही त्या अगदी फिट आहेत, अर्थात यामागचं कारण म्हणजे त्या आपल्या शरीरासाठी घेत असलेली मेहनत. मात्र करिअरच्या सुरुवातीला मृणाल यांनी आपल्या तब्येतीकडे अगदीच दुर्लक्ष केलं होतं. याबद्दल त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला कामामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सांगितलं आहे. याबद्दल त्या म्हणाल्या, “मला असं नक्की वाटतं, की माझ्या कारकीर्दीमधली अतिशय महत्त्वाची वर्षे होती, जिथे मी खूपच काम करत होते. तेव्हा मी माझ्या तब्येतीची अजिबातच काळजी घेतली नाही. तेव्हा ती एक नशा असते. तेव्हा आपण तरुण असतो आणि आपल्याला काहीच होणार नाही असं वाटत असतं.”
यापुढे त्या म्हणाल्या, “विराजस अडीच-तीन वर्षांचा असल्यापासून माझं खऱ्या अर्थाने करिअर सुरू झालं. मनोरंजन क्षेत्रात मी जवळपास १६ ते १७ वर्षे न थांबता काम केलं. महिन्याचे पंचवीस दिवस सकाळी नऊ ते रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत काम करायचे. तेव्हा एक नशा होती, झिंग होती. अनेक चांगली कामे मिळत होती.”
यापुढे मृणाल म्हणाल्या, “तेव्हा कौतुक होत होतं. तेव्हा या सगळ्यांची सवय होते आणि ही सवय सर्वांनाच आवडते. या क्षेत्रात तर ही सवय आपल्याला हवीहवीशीच वाटत असते. कुठे तरी आपण खूप चांगलं करत असताना आपल्याला बाकी काही महत्त्वाचं वाटत नाही. यामुळेच चाळीशीपर्यंत मी माझ्या तब्येतीकडे पुष्कळ दुर्लक्ष केलं असं मला वाटतं.”