Shriya Pilgaonkar Shares Her Skin Care Routine: निरोगी राहण्यासाठी व्यक्तीची जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे असते. चौरस आहार, व्यायाम तसेच गरजेनुसार आहारात-व्यायामात बदल महत्त्वाचे असतात. आता अनेकदा कलाकार त्यांच्या जीवनशैलीबाबत, त्यांच्या डाएटबद्दल, त्वचेची कशी काळजी घेतात याबाबत वक्तव्य करताना दिसतात.

आता अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने एका मुलाखतीत तिच्या डाएटबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच तिच्या जेवणाच्या वेळा काय आणि ती त्वचेची कशी काळजी घेते याबद्दलही तिने खुलासा केला आहे. अभिनेत्री फिट राहण्यासाठी नेमके काय करते, तसेच तिने काय ब्युटी टिप्स दिल्या आहेत, हे जाणून घेऊ…

“तुम्ही काय खाता…”

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने ‘लोकमत सखी’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत ती त्वचेची काळजी कशी घेते यावर म्हणाली, “कोणाचीही त्वचा सतत चांगली नसते. सोशल मीडियावर जे पाहायला मिळतं ते सगळ्यांनी फिल्टर लावलेलं असतं. मला वाटतं की, तुमच्या वयानुसार तुमची त्वचा बदलते. तसेच तुमच्या अनुवांशिकतेचादेखील तुमच्या त्वचेवर परिणाम असतो. माझ्या आजी, आई आणि पप्पांची त्वचा खूप उत्तम आहे. त्यामुळेदेखील त्वचा चांगली आहे. खाण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आपण प्रॉडक्टबाबत बोलतो, पण तुम्ही काय खाता इथून त्वचेची काळजी घेणे सुरू होते.”

दररोज ती काय करते यावर श्रिया म्हणाली, “रोज मी क्लिसिंग, टोनर, सनस्क्रीन लावते. मी सनस्क्रीन दररोज लावते, त्यात मी तडजोड करत नाही. रात्री झोपण्याआधी आळस येतो, पण आळस येऊ नये कारण मेकअप नीट काढायला लागतो. झोपताना मी स्लीप मास्क किंवा एक रेटनॉल वापरते. तिशीत रेटनॉल महत्त्वाचे आहे, तर पाच-सहा प्रॉडक्ट वापरते. पण, त्या कुठल्याच प्रॉडक्टमध्ये सुंगध नसतो. जेव्हा प्रॉडक्टमध्ये सुंगध असतो तेव्हा काळजीपूर्वक बघा की तुमच्या त्वचेवर त्याचा कसा परिणाम होतो. तर मी सुंगध असलेले प्रॉडक्ट वापरते.”

डाएटबद्दल श्रिया म्हणाली, “मी फुडी आहे, पण सगळ्यात संतुलन ठेवते. मी व्यायाम करते. जेव्हा मला जंक फूड खायचं असतं, तेव्हा मी ते खाते. पण, ते किती प्रमाणात आणि कधी खाता हे महत्त्वाचं आहे. मी संध्याकाळी लवकरच जेवते, कारण मी १० वर्षे जलतरणपटू होते, त्यामुळे ती शिस्त माझ्यात आहे. मी ७ वाजता जेवते. मला गोड खूप आवडतं, पण मला वाटतं की तुम्ही कधी, काय खाता ती वेळ बघणं महत्त्वाचं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रिया असेही म्हणाली की खूप लोक तुम्हाला खूप सल्ले देतील. पण, तुमची त्वचा कशी आहे आणि कोणत्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतो, हे आधी नीट समजून घ्या, असे म्हणत त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला अभिनेत्रीने दिला.