Smita Gondkar on Her Career: ‘प्रेमाचा झोलझाल’, ‘भय’, ‘गडबड गोंधळ’, ‘ये रे ये रे पैसा २’, ‘द एआय धर्मा स्टोरी’, ‘चंद्रमुखी’, ‘दिल दोस्ती दीवानगी’, अशा अनेक चित्रपटांत काम करत अभिनेत्री स्मिता गोंदकरने अभिनय क्षेत्रात तिची ओळख निर्माण केली आहे.

चित्रपटांबरोबरच अभिनेत्री काही रिअॅलिटी शोमध्येदेखील दिसली आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत ती अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी काय काम करायची याबद्दल वक्तव्य केले आहे.

स्मिता गोंदकर काय म्हणाली?

स्मिताने नुकतीच ‘बातों बातों में’ या पॉडकास्टला मुलाखतीत दिली. या मुलाखतीत स्मिता गोंदकर म्हणाली, “शाळेत असताना मला ऑस्ट्रेलियातील ट्रक ड्रायव्हर व्हायचं होतं, कारण तेथील ट्रक खूप मोठे असतात. जेव्हा मी मोठी झाली तेव्हा मला समजलं होतं की, मला फिरायचं आहे. मला समुद्र खूप आवडतो. त्यावेळी मी ठरवलं की क्रूझ लाइनवर काम करायचं. त्याआधी मला थोडा मनात गोंधळ होता. आमचा पुण्यात कौटुंबिक व्यवसाय आहे, त्यामुळे मला असं वाटलं की, आयुष्यात काहीही नाही झालं तरी मला कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावता येईल. या विचाराने मी हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं.”

“त्यानंतर मात्र क्रूझ लाइनमध्येच काम करायचे आहे हे मला स्पष्ट होतं. कॉलेज संपत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत होते. त्यासाठी मी वेगवेगळे क्लास केले. विविध भाषा शिकले. हिंदी, मराठी, इंग्रजी तर मला येतं, आई कर्नाटकची असल्यामुळे कन्नड येतं, त्यावेळी मी फ्रेंच शिकले होते.”

“मी जेव्हा अमेरिकेत क्रूझवर नोकरीला लागले होते, तेव्हा मला पहिल्याच आठवड्यात त्रास दिला गेला होता. माझ्या वडिलांनी मला एकाच अटीवर अमेरिकेला पाठवले होते. ते मला म्हणाले होते की, जर तुला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर लगेच भारतात परत यायचं. पण मी विचार केला की, माझ्या वडिलांनी ६०-७० हजार जितका खर्च केला आहे. तितके पैसे मी कमावल्यानंतर की मी परत जाईन. मात्र, ते पैसे कमवेपर्यंत मला तिथे राहण्याची सवय झाली.” अभिनेत्री असेही म्हणाली की मी तिथे खूप गोष्टी शिकले. मला आत्मविश्वास आला. मला समुद्र पाहता आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच स्मिताला कार रेसिंगमध्येदेखील आवड आहे. ती बाईकिंगदेखील करते. स्मिताच्या कामाबद्दल बोलायचे तर तिने ‘मुंबईचा डब्बेवाला’ या चित्रपटातून पदार्पण केले. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातून अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. स्मिताने काही म्युझिक व्हिडीओमध्येदेखील काम केले आहे. सध्या सुरू असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातदेखील ती दिसली होती.