सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे समीकरण आता काही नवीन राहिलेलं नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कलाकारांच्या अनेक चांगल्या गोष्टींचं कौतुक होतं. मात्र कौतुकापेक्षा अधिक आता ट्रोलिंगचं प्रमाणही वाढलं आहे. सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकार त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच कामानिमित्तची माहिती देण्यासाठी ते या माध्यमाचा वापर करतात. पण अनेकदा या कलाकारांना ट्रोलिंग सहन करावं लागतं.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगकडे काही कलाकारांनी आता गप्प राहणंच पसंत केलं आहे. मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार या ट्रोलर्सकडे दुर्लक्षच करतात; पण काही असे कलाकार आहेत, जे या ट्रोलर्सना योग्य शब्दांत स्पष्टपणे सुनावतात. अशातच या ट्रोलर्सबद्दल मराठी अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर आणि या ट्रोलर्सवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
‘इसापनिती’ या युट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात सोनाली यांनी ट्रोलर्ससाठी एक सामुदायिक सभा घेऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली होती. तसंच या ट्रोलर्सच्या कमेंट्स फक्त नकारात्मकच का असतात? त्यांना सकारात्मक असं काही दिसत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
याबद्दल सोनाली म्हणालेल्या, “ट्रोलर्ससाठी एक नाही तर अनेक सामुदायिक सभा घेतली पाहिजे. तुम्ही या आणि व्यक्त व्हा की, तुम्हाला नक्की काय आवडत नाही. मी एके ठिकाणी बसून कलाकारावर कमेंट करणार की, काय कपडे घातले आहेत? हीच का आपली संस्कृती? मी हे लिहून मोकळी झाले.कुणाला इतका वेळ आहे की, हे लिहिणारी मी कोण आहे? याबद्दल जाणून घ्यायला.”
यानंतर सोनाली म्हणालेल्या, “पण त्यांचं असं असतं की, माझं अस्तित्व मी दाखवणार आणि मला खटकलेली गोष्ट मी बोलून दाखवणार. पण तसंच मला आवडलेली गोष्ट मी सांगते का? हा सुद्धा एक मुद्दा आहे. आपण हिरीरीने आक्षेप व्यक्त करतो. पण ‘तो सिनेमा खुप सुंदर आहे, तुम्ही बघा’ असं सांगतो का? आपल्याला एखादं चांगलं काही असेल तर ते का सांगावसं वाटत नाही.”
यापुढे सोनाली म्हणाल्या होती की, “आपण माणूस आहोत. आपल्याकडे मेंदू आहे. आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. मग ते सगळं नकारात्मकच का असतं?” दरम्यान, सोनाली नुकत्याच ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटात पाहायला मिळाल्या. यात त्यांच्याबरोबर अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होता.