कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी आपल्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी आपल्या वक्तव्यांमुळे कलाकार चर्चांचा भाग बनतात. अभिनेता स्वप्नील जोशी( Swapnil Joshi) ने नुकतीच एक मुलाखत दिली. यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता स्वप्नील जोशीने ‘व्हायफळ’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी त्याने आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितले, “लहानपणी स्वत:ची बॅन्जो पार्टी होती. प्रकाश काका आणि राजा काका यांची बॅन्जो पार्टी होती आणि त्यात मी बुलबुल तरंग वाजवायचो. माझ्या बुलबुल तरंगची ३६ कोळी गीतांची ऑडिओ कॅसेटदेखील आहे”, अशी आठवणही अभिनेत्याने सांगितली आहे.

अभिनेत्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, मी गिरगावच्या चाळीत राहिलो आहे. गॅलरीत झोपायचं, गणपतीत दहा दिवस मंडपात राहायचं, ती मजा होती. गिरगावच्या आठवणी कायम माझ्यासोबत असल्याचे स्वप्नील जोशीने म्हटले आहे.

हेही वाचा: “शेतकऱ्याची पोरं…”, ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेची कामगिरी पाहून हेमंत ढोमे भारावला, म्हणाला, “प्रचंड अभिमान…”

याबरोबरच फोनमुळे माणसं एकमेकांपासून लांब गेल्याचेही वक्तव्य त्याने केले आहे. तो म्हणतो, “पूर्वी फोन जवळ नव्हते, तर माणसं जवळ होती. आता फोन जवळ आलेत, तर माणसं दूर गेली आहेत. त्यावेळी माणसा-माणसात संवाद होता. एका हॅलोवरून कळायचं की, समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय. माणसं माणसासाठी धावून यायची. आता प्रत्येकाला असं वाटतं की, तुझा काहीतरी अजेंडा आहे. प्रत्येकाला ही काळजी वाटतेय की, ही व्यक्ती मला का मदत करतेय. हा का माझ्याशी चांगला वागतोय, याचा काहीतरी हेतू असणार.”

पुढे बोलताना त्याने म्हटले की, “मी कायम हसतमुख असतो, तर लोकांना मी खोटा वाटतो. तर मी एका मित्राला विचारलं होतं, असं का रे? मी चांगला वागतो तरी लोकांना माझ्याबद्दल असे का वाटते? त्यावर तो म्हणाला होता की, ही तुझी समस्या नाही. आजकाल असे लोकच पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे लोकांना तुझ्यासारख्या हसतमुख, कायम इतरांना मदत करणाऱ्या व्यक्ती खोट्या वाटतात. ही समाजाची समस्या आहे की, अशी लोकंच कमी झालेले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘उत्तर रामायण’ आणि ‘श्रीकृष्ण’ मालिकेचा त्याच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला,रामानंद सागर यांच्याबरोबर शूटिंगचे अनुभव कसे होते, यावरदेखील अभिनेत्याने भाष्य केले आहे.