Education of kshitija Ghosalkar Parab: ‘टाइमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परबला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने टकाटक, टाइमपास २, टाइमपास ३, उर्फी, बालक-पालक अशा चित्रपटांतूनही लोकप्रियता मिळवली.
प्रथमेश अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. त्याची पत्नी क्षितिजा परब सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच तिचे यूट्यूब चॅनेल असून, ती तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खास गोष्टी शेअर करीत असते.
क्षितिजा परबचे शिक्षण किती?
नुकत्याच एका युट्यूब व्लॉगमध्ये क्षितिजाने तिचे शिक्षण किती, याचा खुलासा केला आहे. क्षितिजा म्हणाली की, माझं पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण श्रीवर्धनमध्येच झालं. ११ आणि १२ वी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलं. मी बारावीला माझ्या कॉलेजमध्ये पहिली आले होते. १२ वीच्या सुटीत मी अभिनय प्रशिक्षण घेतलं. वर्कशॉप केलं आणि मला नाटकाची आवड लागली. त्यानंतर १२ वी आणि सीईटीचा निकाल लागला.
बीडीएस(BDS)साठी मी नाशिकच्या एका कॉलेजमध्ये माझं नाव आलं होतं. पण, मी त्यावेळी विचार केला की पाच-साडेपाच वर्षं नाशिकला गेले, तर इथे जी अभिनयाची सुरुवात केली आहे, ती आवड कशी जपणार? असा विचार करून मी ते अॅडमिशन रद्द केलं. त्यानंतर मी बायोटेक्नोलॉजीला अॅडमिशन घेतलं. मी बायोटेक्नोलॉजीमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर मी पीएच.डी.ची तयारी केली.
एम.एस्सी.चा निकाल लागायचा होता. यादरम्यान, मी एका ट्रॅव्हल शोचं अँकरिंग करीत होते. तो ट्रॅव्हल शो मी लिहिला होता. प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही एका एनजीओला भेट द्यायचो. मला वाटलं की, समाजसेवेत का करिअर करू शकत नाही. त्याआधी मी बायोटेक्नोलॉजीची असिस्टंट प्रोफेसर होते. त्यानंतर मी बायोलॉजीची कंटेन्ट रायटर होते आणि आता मी कोटक एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये काम करते. आता जवळजवळ साडेसहा वर्षं झाली आहेत. तिथे मी ट्रेनी स्पेशालिस्ट म्हणून काम करते. ट्रेनर्सना ट्रेनिंग देणं, कंटेट डिझाईन करणं, ते डिजिटल करणं ही कामं मी करते.
पुढे क्षितिजा असेही म्हणाली की, कोणाचा प्रवास कसा सुरू होईल हे माहीत नसतं. वेगळं काहीतरी बनायचं असतं आणि आता वेगळं काहीतरी करत आहे. पण, हे मनापासून करत आहे. मला खूप मजा येते. मी अशा क्षेत्रात काम करीत आहे, जिथे खरंच खूप काम करण्याची गरज आहे. मला वाटतं की इंजिनियरिंग, पीएचडी केलं नाही, ते बरं झालं. कारण- तिथे अत्यंत हुशार लोक आहेत. हे असं क्षेत्र आहे, जिथे भरपूर लोकांनी येऊन काम करण्याची गरज आहे.
दरम्यान, क्षितिजा अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. प्रथमेशबरबरचे अनेक फोटोदेखील ती शेअर करते.