सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर दोन हल्लेखोरांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळ्या झाडल्या. हे दोघेही हल्लेखोर दुचाकीवरून त्याच्या घरापर्यंत आले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून सदर दुचाकी आणि हल्लेखोरांचा माग काढला आहे. हे दोन्ही हल्लेखोर एक महिन्यापासून पनवेल येथे वास्तव्यास होते. तसेच त्यांनी पनवेल मधूनच सदर दुचाकी विकत घेतली होती, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही हल्लेखोरांनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर त्याच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती का? या शक्यतेचाही तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांना तपासात आढळून आले की, गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी दुचाकी माऊंटमेरी चर्च जवळ थांबविली आणि तिथून ते वांद्रे स्थानकात जाऊन लोकल पकडून पसार झाले. त्यानंतर त्या दोघांनी सांताक्रूझ स्थानकात उतरून रिक्षा पकडली. पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, दोघांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करून शहराबाहेर पळ काढला असावा.
काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान खानला बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केल्यानंतर काही तासांतच अनमोल बिश्नोई नामक फेसबुक अकाऊंटवरून सलमान खानला इशारा देणारी कथित फेसबुक पोस्ट टाकण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या पोस्टची सत्यता पडताळली. सदर पोस्ट पोर्तुगालच्या आयपी ॲड्रेसवरून अपलोड झाली असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगकडून याआधी तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. यापैकी दोन वेळा सलमान खान तर एकदा आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती.
वांद्रेमधील गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविणार असल्याचे जाहीर केले. तसेच आज (दि. १५ एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः गॅलक्सी अपार्टमेंट येथे सलमान खान कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले.