साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिलीजच्या प्रतिक्षेत असलेला अभिनेत्री नयनतारा हिचा आगामी ‘नेत्रिकन्न’ हा चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज झाला असून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. मिलिंद राऊ दिग्दर्शित ‘नेत्रिकन्न’ या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलीय. चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. नयनतारा मुख्य भूमिकेत असलेली ही तमिळ थ्रीलर फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

डिस्ने + हॉटस्टारच्या ट्विटर अकाउंटवर नयनतारा स्टारर ‘नेत्रिकन्न’ या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. हे पोस्टर शेअर करण्याबरोबरच हा चित्रपट लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर डिस्ने + हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. या चित्रपटाचा प्रोड्यूसर विग्नेश शिवन याने हे ट्विट शेअर करत चित्रपट रिलीजच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘आनंद आणि अभिमान वाटतोय…!!! रिलीजची तारीख लवकरच’ असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

नयनतारा ही तमिळ अभिनेत्री असली, तरी तिचे टॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिच्या ‘नेत्रिकन्न’ चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच हा चित्रपट कधी येणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री नयनतारा हिचा ‘नेत्रिकन्न’ हा चित्रपट ‘रायन पिक्चर्स’ या बॅनरखाली प्रोड्यूसर विग्नेश शिवनची पहिली निर्मिती असणार आहे. हा चित्रपट ‘ब्लाइंड’ नावाच्या एका कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचं सांगण्यात येतंय. हा एक तमिळ थ्रीलर चित्रपट असून यात एक अंध महिला हिट-अ‍ॅण्ड-रन प्रकरणात साक्ष देते आणि त्यामूळे हत्यारे आणि तिच्यातला रंगणारा रंजक सामना या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसंच अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात पोलिस अकादमीमधल्या एका कॅडेटच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात एका कार अपघातात ती आपले डोळे गमावते.

 

करोना परिस्थितीमुळे हा चित्रपट रिलीजसाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची अधिकृत घोषणा केली असली तरी हा चित्रपट कधी रिलीज होणार याची तारीख मात्र अद्यार जाहीर केलेली नाही. या चित्रपटाच्या मेकर्सनी तब्बल १५ कोटी रूपयांमध्ये स्ट्रिमिंगचे हक्क खरेदी करण्यात आले आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री नयनतारासह जमल अमीर, माणिकंदन पट्टंबी आणि सारण देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला तर पोहोचली आहे, मात्र चित्रपटाच्या रिलीज डेटसाठी प्रतिक्षा करत आहेत.