हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. नुकताच मनोज बाजपेयी यांचा 'सिर्फ एक बंदा काफी है' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट आसराम बापू यांच्या केसवर आधारीत असल्याची चर्चा झाली आणि यामुळे बऱ्यापैकी वादही निर्माण झाला. प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. मनोज यांच्या कामाचंही लोकांनी प्रचंड कौतुक केलं. आणखी वाचा : "मला लाज वाटली…" मनोज बाजपेयींचा चित्रपट पाहून पत्नी शबानाने केली अभिनेत्याची चांगलीच कानउघडणी एका मुलाखतीमध्ये मनोज यांनी हे स्पष्ट केलं होतं की काही निवडक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार चित्रपटगृहांच्या शोजची संख्या वाढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता लवकरच आणखी काही चित्रपटगृहातही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम ओटीटीवर आणि त्यानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'सिर्फ एक बंदा काफी है' हा पहिला चित्रपट ठरणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की याबद्दल म्हणाले, "चित्रपटगृहाच्या प्रदर्शनाबद्दल स्टुडिओ आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यात चर्चा सुरू आहे. अशी चर्चा प्रथमच कोणत्या चित्रपटाच्या बाबतीत सुरू आहे हे फार चांगलं लक्षण आहे. चित्रपटगृहाच्या माध्यमातून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि एका दिग्दर्शकाला हेच हवं असतं. जर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये लागला तर मला आनंदच होईल."