मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही लोकप्रिय असलेली जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. या जोडीने आजवर अनेक हिट चित्रपट देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लाडकी लेक श्रिया पिळगांवकरदेखील अभिनय क्षेत्रात आली. ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘ड्राय डे’, ‘ताजा खबर’सारख्या सीरिजमधून श्रियाने ओटीटी विश्व गाजवलं आहे.

अशातच आता लवकरच ती ‘छलकपट’ सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटीमध्ये श्रियाने अनेकविध भूमिका साकारल्या आहेत. ‘छलकपट’ सीरिजनिमित्ताने श्रियाने नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. यावेळी तिला सीरिजमधील बोल्ड सीन करताना कोणता विचार करावा लागतो का? याबद्दल आई-वडिलांशी चर्चा होते का? असं विचारण्यात आलं.

याचं उत्तर देताना श्रिया म्हणाली, “मला वाटतं ऑफस्क्रीन संस्कार हे ऑनस्क्रीन संस्कारांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. मला माझ्या ऑफस्क्रीन संस्कारांवर विश्वास आहे. पण एक कलाकार म्हणून मी स्वत:वर मर्यादा घालू शकते असं मला वाटतं नाही किंवा तसं करूही नये. आता काळानुसार एखादी गोष्ट सांगण्याची पद्धत खूप बदलली आहे. आताच्या कामातली मर्यादा आणि सहजता पुर्वीपेक्षा बदलली आहे.”

यापुढे श्रिया म्हणते, “एखाद्या प्रेमकथेमध्ये मुलगा-मुलगी हे किस करताना दाखवलं जातं. तसे सीन करण्यासाठी मी नाही म्हणणार नाही. पण ते पडद्यावर कसं दाखवलं जाणार आहे? त्या सीनला कसं साकारलं जाणार आहे? त्यामागे नक्की काय भावना आहे? हे महत्त्वाचं आहे. मला स्वत:ला कळतं की, त्यामागचा नेमका अर्थ काय आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे श्रिया म्हणाली, “एखाद्या सीरिजमधील बोल्ड सीनमुळे त्याचं थेट मूल्यमापन करू नये. कारण ती त्या-त्या कथेची गरजही होती. त्यामुळे मला वाटतं की, अशा सीनमागची तुमचा हेतु महत्त्वाचा आहे. यासाठी आई-वडील मला नेहमीच पाठींबा देतात. पण त्यांना माहीत आहे की, मलाही ते निर्णय घेण्याचं स्वतंत्र आहे. पण इंटरनेटवर काहीही होऊ शकतं. फेक व्हिडीओ वगैरे… काहीही होऊ शकतं.”