Priyanka Chopra Congratulate to Parineeti Chopra for Welcoming a Baby Boy : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आई-बाबा झाले आहेत. परिणीतीने १९ ऑक्टोबरला गोंडस बाळाला जन्म दिला आहे. परिणीती आणि राघव चड्ढा यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करीत परिणीती आणि राघव यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. प्रियांका चोप्रादेखील मावशी झाल्याबद्दल खूप आनंदी आहे. मावशी बनलेल्या प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर आपली बहीण परिणीती आणि राघव यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, “परिणीती आणि राघव यांना खूप खूप शुभेच्छा.”

परिणीती चोप्राने या वर्षी ऑगस्टमध्ये घोषणा केली होती की, ती आणि राघव चड्ढा एका नवीन आयुष्याची सुरुवात करीत आहेत. तिने एका पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आणि तेव्हापासून चाहते तिच्या आई होण्याची वाट पाहत होते. या जोडप्याने अद्याप त्यांच्या बाळाची झलक शेअर केलेली नाही किंवा त्याचे नावही सांगितलेले नाही.

परिणीतीने मुलाला जन्म दिल्यानंतर राघव चड्ढा पोस्ट शेअर करीत म्हणाले, “याआधीचं आयुष्य आम्हाला आठवत नाही…अगोदर आम्ही एकमेकांसाठी होतो. आता आमच्याकडे सगळं काही आहे”, असं म्हणत परिणीती आणि राघव यांनी मुलगा झाल्याची माहिती दिली. त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करीत चाहते आणि सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे.

परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनन्या पांडे, क्रिती सेनॉन, हरभजन सिंग, आयुष्मान खुराना, मनीष मल्होत्रा, जेनिफर विंगेट, सुनील ग्रोव्हर, भारती सिंग व नील नितीन मुकेश यांच्यासह बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर दोन वर्षांनी ते आई-बाबा झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात परिणीतीने गरोदर असल्याचे सांगितले होते. आता चिमुकल्याच्या आगमनाने दोघांच्याही कुटुंबांत आनंद साजरा होत आहे.