विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ चित्रपटातील नवे कोरे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटातील या गाण्यामध्येही कंगना रणौत पुन्हा एकदा अनेकांचेच लक्ष वेधत आहे. ‘मेरे मिया गये इंग्लंड’, असे बोल असणारे हे गाणे ‘मेरे पिया गये रंगून’ या गाण्याच्या जवळ जाणारे वाटले तरीही या गाण्याचा बाज पूर्णपणे वेगळा आहे. रेखा भारद्वाज यांनी हे गाणे गायले असून सध्या ते सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
गाण्याची चाल आणि एकंदर नृत्य पाहिले तकर याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ब्लडी हेल’ या गाण्याच्या तुलनेत हे गाणे तितके प्रभावी नाही. पण, ज्या पद्धतीने गाणे शब्दबद्ध करण्यात आले आहे ते अनेकांचेच लक्ष वेधत आहे. शाहिद कपूर आणि सैफ अली खानसुद्धा या गाण्यात दिसत आहेत. या गाण्यात कंगना जुन्या काळातील चित्रपट अभिनेत्रीप्रमाणे दिसत आहे. तिचा हा लूक आणि एकंदर वेशभूषा पाहताना १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ किंवा १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मधुमती’ या चित्रपटातील पद्मीनी आणि वैजयंतीमाला या अभिनेत्रींची आठवण येते. यासोबतच गाण्यात सैन्यदलातील जवानांच्या वेशात असलेले सहकलाकारही कंगनासोबत ताल धरत आहेत. या संपूर्ण गाण्यामध्ये कंगनाचा हा वेगळाच अंदाज अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विशाल भारद्वाज दिग्दर्शित या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरमधून ‘जानबाज जुली’च्या भूमिकेत दिसणाऱ्या कंगनाने अनेकांचेच लक्ष वेधले होते. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखविण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये कंगना १९४० दरम्यानच्या एका चित्रपट नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शाहिद या चित्रपटामध्ये जमादार नवाब मलिक या भूमिकेत झळकणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटाचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे दर्शन होत आहे. प्रेमाचा त्रिकोण दाखविणाऱ्या या चित्रपटात लव्ह (प्रेम), वॉर (युद्ध) आणि डिसिट (धोका) या त्रिकोणाभोवती फिरणारे कथानक पाहायला मिळू शकते. धैर्य, गॅम्बल आणि रोमान्सची सांगड घालणारा हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.