रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, गोठावलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे न्यायालयाचे आदेश

तसेच तिला तिच्या वस्तूही परत करण्यात याव्या, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणानंतर रिया चक्रवर्तीला एनडीपीएस कायद्यांतर्गत बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले होते. तसेच तिच्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणानंतर तिने तिच्या या वस्तूंकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. नुकतंच न्यायालयाने यावर सुनावणी करत तिची खाती पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहे. तसेच तिला तिच्या वस्तूही परत करण्यात याव्या, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

रियाने दाखल केलेल्या याचिकेत तिने म्हटले आहे की, “मी व्यावसायाने एक अभिनेत्री/ मॉडेल आहे. एनसीबीने १६ सप्टेंबर २०२० रोजी कोणतीही नोटीस न देता माझी बँक खाती आणि एफडी गोठवली होती. हा माझ्यावर करण्यात आलेला गंभीर अन्याय आहे. बँक खाती गोठवल्यामुळे माझ्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, जीएसटी भरण्यासाठी तसेच इतर व्यवहारांमध्ये अडचणी येत आहेत. मी हे व्यवहार बँक खाती गोठवण्यात आल्याने पूर्ण करु शकत नाही. त्यासाठी बँक खात्याची आवश्यकता आहे. तसेच त्या बँक खात्यातील रक्कमेतून मी माझा खर्च भागवते. माझा लहान भाऊ हा माझ्यावर अवलंबून आहे. गेल्या १० महिन्यांपासून माझी ही बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे ती लवकरात लवकर पूर्वस्थितीत करण्यात यावी, अशी मी विनंती करते,” असे तिने या याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे म्हणाले की, “सध्या या सर्वांची आर्थिक चौकशी सुरू आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नाही.” त्यामुळे एनसीबीने या अर्जाला विरोध केला. “तसेच जर ती खाती पूर्वस्थितीत केली गेली तर तपासात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे कोर्टाने ही याचिका फेटाळावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश डी.बी. माने यांनी निकाल दिला. “तपास अधिकाऱ्यांच्या जबाबावरून असे दिसून येते की, चक्रवर्ती यांची बँक खाती आणि एफडी गोठवण्यास एनसीबीकडून कोणताही तीव्र आक्षेप नाही. पण त्यासाठी तिला काही नियम आणि अटींचे पालन करुन बँक खाती किंवा एफडीसंदर्भातील माहिती सादर करणे आवश्यक असेल,” असे न्यायालयाने सांगितले आहे.

कोवळे ऊन अन् …., रिया चक्रवर्तीच्या नव्या फोटोची सर्वत्र चर्चा

तर दुसऱ्या याचिकेत रियाने तिचे गॅजेट्स, मॅकबुक प्रो, अॅपल लॅपटॉप आणि अॅपल आयफोन परत करण्याची मागणी केली आहे. याची योग्य पडताळणी झाल्यानंतर रिया चक्रवर्तीला तिचे गॅझेट परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भातील सुपूर्दनामाही तयार करुन घ्या. तसेच एक लाखांच्या बॉण्ड करुन तिला तिच्या वस्तू परत करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन एक वर्ष उलटलं आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आलं होतं. यानंतर अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतसंबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नावही समोर आले होते. याप्रकरणी १ महिन्यासाठी तिला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rhea chakraborty bank account defreezed after a year gadgets returned by court nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती