काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान खान सलमानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दबंग ३’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र ट्रेलर प्रदर्शित होताच सलमान खानला ट्रोल करण्यात आले होते. ट्रोलींगचे कारण कळून तुम्हालाही धक्का बसेल.

‘दबंग ३’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलरच्या शेवटी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दिली आहे. त्या ठिकाणी डिसेंबरची स्पेलिंग चुकीची लिहिली आहे. ‘DECEMBER’ ऐवजी ‘DECEMEBER’ असे देण्यात आले होते. अनेकांनी निर्मात्यांच्या या चुकीमुळे स्क्रीनशॉट शेअर करुन याबाबत सलमानला विचारले आहे. एका युजरने तर ‘इंग्रजी भाषेला माझी श्रद्धांजली’ तर दुसऱ्या एका युजरने ‘दबंग ३ चित्रपटाची टीम बेजबाबदार आहे’ असे लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ३ मिनिटे २२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सलमान आपल्या दबंग शैलीत गुंडांबरोबर फाईटींग करताना दिसत आहे. ‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमिवर विचार ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.