बिग बॉस ११ नंतर सलमान खान टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांपासून दूर जाणार असा अनेकांचा अंदाज होता. पण दबंग खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. बिग बॉसचे हे ११ वे पर्व संपल्यानंतर सलमान खान ‘दस का दम’ या शोच्या तिसऱ्या पर्वात दिसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सलमान ‘टायगर जिंदा है’ या त्याच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन संपल्यावर तो ‘दस का दम शो’च्या चित्रीकरणाला सुरूवात करेल. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही मालिका प्रसारित केली जाईल.




वाहिनीचे कार्यकारी उपप्रमुख दानिष खान यांना ‘दस का दम’बद्दल विचारले असता ते म्हणाले की, ‘या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खानशिवाय योग्य व्यक्ती शोधून सापडणार नाही. दोन पर्वांसारखे हे तिसरे पर्व अजिबात नसेल. यात काही बदल करण्यात आले आहेत. यावेळी ‘कौन बनेगा करोडपती’ने एक वेगळा विक्रम रचला होता. सुमारे तीन कोटी लोक मोबाइलवर केबीसी खेळले. त्यामुळे ‘दस का दम’ या कार्यक्रमालाही तेवढीच प्रसिद्धी मिळेल, असा आमचा अंदाज आहे. सुरूवातीच्या दोन पर्वानंतर हा कार्यक्रम पुन्हा टेलिव्हिजनवर आला नव्हता. मात्र, आता तब्बल आठ वर्षांनी ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’
बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला सलमान खान हे खूप मोठे नाव आहे. सलमानचा सिनेमा म्हटला की १५०-२०० कोटींचा गल्ला सहज कमवणार असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून अॅक्शन- थ्रीलर चित्रपटांकडे त्याचा जास्त कल वाढला आहे. या सिनेमांसाठी तो विशेष मेहनत घेत असतो. त्याची पिळदार शरीरयष्टी पाहून अनेक अभिनेत्यांना त्याचा हेवा वाटतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘दबंग’, ‘सुलतान’ आणि आता ‘टायगर जिंदा है’ या सिनेमांमधील लूकसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे.