बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी वर्षाअखेरीस गोड बातमी आहे. यंदाच्या वर्षीच्या राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्काराने शाहरुखला गौरविण्यात येणार आहे. गेल्या तीनवर्षापासून यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनिय कामगिरीबद्दल कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी झालेल्या तीन पुरस्कारांवर बीग बी अमिताभ बच्चन, गान कोकिळा लता मंगेशकर आणि रेखा या दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता यंदाच्या चौथ्या वर्षी शाहरुख खानला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या यादीत शाहरुखचा समाविष्ट होणार आहे. शाहरुखला २५ फेब्रुवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाहरुख खान आणि यश चोप्रांचे खूप चांगले संबंध होते. यश चोप्रांच्या ‘दिल तो पागल है’, ‘वीर जारा’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटात शाहरुखने भूमिका केली आहे.‘जब तक है जान’ या शाहरुखसोबतच्या चित्रपटानंतर यशचोप्रा यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली होती ‘जब तक है जान’ हा त्यांचा २२ वा चित्रपट होता.

विजय, चांदणी, लम्हे यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे उद्योगपती, राजकारणी टी. सुब्रमणी रेड्डी यांनी विख्यात चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या स्मृती प्रित्यर्थ या राष्ट्रीय पुरस्कार देण्यास सुरुवात केली. या पुरस्काराच्या सुरुवातीला गान कोकिळा लता मंगेशकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मला पुरस्कार आणि दहा लाख रुपये मिळणार म्हणून मी येथे आलेले नाही. तर, यशजी हे खूप खास असून, ते माझ्या हृदयाच्याजवळ होते. असे सांगत लतांनी पुरस्कार स्वीकारला होता. यशजींच्या मृत्यूपूर्वी अखेरची भेट न होऊ शकल्याची खंतही लता दीदींनी यावेळी व्यक्त केली होती.

‘रईस’ या आगामी  चित्रपटातून शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिका उठावदार करण्यासाठी शाहरुख खानने लतीफच्या मुलाचीही भेट घेतली होती. यावेळी लतिफचा मुलाने शाहरुखला सहकार्य केले. मात्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर  मुश्ताक अहमदने शाहरुखच्या चित्रपटावर आक्षेप घेतला होता.