|| गायत्री हसबनीस

‘एरवीच्या तथाकथित कथांपेक्षा वास्तववादी कथा प्रेक्षकांना भावतात आणि त्या कथा प्रेक्षक आवर्जून पाहतात,’ असं अभिनेता शरद केळकर म्हणतो. शरद केळकरचं नाव घेतले की चटकन पहिल्यांदा ‘लय भारी’तला संग्राम आठवतो. त्याने साकारलेल्या या नकारी व्यक्तिरेखेला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांकडूनही पसंती मिळाली. तोवर हिंदी मालिकांमधला लोकप्रिय मराठी चेहरा ही शरदची ओळख होती. छोट्या पडद्यावर यशस्वी ठरलेल्या शरदने ‘लय भारी’तून केलेला वेगळा प्रवेश त्याला नवी ओळख मिळवून देणारा ठरला. त्यानंतर ‘तान्हाजी’ सिनेमात त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका लक्षवेधी ठरली. ‘लक्ष्मी’ सिनेमात तर शरदने तृतीयपंथीयाची भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारली. मराठी चित्रपटनिर्मितीतही रस घेणाऱ्या शरदचा भारदस्त आवाज ही त्याची एक वेगळी ओळख ठरू पाहते आहे. याच आवाजाच्या जोरावर नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरील एका शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून तो पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar engaged with social media sonalee patil
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

एकसारख्या भूमिकांच्या मागे न लागता सतत नवीन काही करू पाहणारा शरद ‘नॅशनल जिओग्राफिक इंडिया’च्या ‘केस फाइल्स’ या नवीन मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतून रहस्यमय, गुन्हेगारी विश्वातील खरीखुरी प्रकरणे समोर येणार आहेत. ही प्रकरणे आणि त्यातील गुंतागुंत प्रेक्षकांसमोर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून उलगडण्याचे काम तो करणार आहे. या मालिकेतून गुन्हा कसा घडला हे दाखवण्यात येणार आहे, मात्र त्याचबरोबरीने संबंधित गुन्ह्याचा माग कसा घेतला गेला, एखाद्या घटनेचा केला जाणारा तपास, त्यासाठी घेतली जाणारी विविध यंत्रणांची मदत यांबद्दल सविस्तरपणे या मालिकेतून प्रकाश टाकण्यात येणार आहे. एखादे विमान कोसळले तर त्याचा तपास कसा होईल, इथपासून ते एखाद्या स्मगलरचा शोध घेत त्याला कसं हुडकून काढलं जातं अशा विविध पद्धतीने गुन्ह्यांची माहिती उलगडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे. ही माहिती रंजकतेने मांडत प्रेक्षकांना त्या कथेत गुंतवून ठेवण्याचं आव्हान शरदसमोर आहे.

या मालिकेतून सध्या वाढत चाललेल्या गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकण्यात येणार आहे, या कथा खऱ्या, प्रेक्षकांना वास्तव परिस्थितीविषयी भान आणून देणाऱ्या आहेत, असं शरद म्हणतो. गुन्हे एकाच प्रकारचे नसतात, त्यामुळे या मालिकेतूनही वेगवेगळ्या क्षेत्रांत भिन्न भिन्न प्रकारे घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी माहिती दिली जाणार आहे, असे सांगतानाच या कार्यक्रमाचे स्वरूपही वेगळे असल्याचे त्याने स्पष्ट केले. या मालिकेत बरेच विषय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक गुन्ह्यामागे कारणीभूत असलेल्या व्यक्ती, गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या जागा या सगळ्यांचे संदर्भ देत त्या त्या घटनेचा तपास सविस्तरपणे प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार असल्याचेही शरदने सांगितले. अशा कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची असते, असे सांगतानाच आपण प्रेक्षकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन सूत्रसंचलन करणार असल्याचेही त्याने सांगितले. प्रत्येक भागात सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे आव्हान माझ्यासमोर आहेच, मात्र त्यातून प्रेक्षकांना ज्याबद्दल सावध करायचे आहे तो संदेशही योग्य पद्धतीने पोहोचला पाहिजे हे लक्षात घेत मी माझ्या कथा सांगण्याच्या शैलीत बदल करणार आहे, असे त्याने सांगितले.

छोट्या पडद्यावरचा देखणा नायक म्हणून तो लोकप्रिय होता, आता तो सातत्याने नकारी किंवा वेगळ्याच भूमिकांमधून लोकांसमोर येतो आहे. हा बदल एक अभिनेता म्हणून आपल्या पथ्यावर पडला असल्याचे तो सांगतो. मला तथाकथित नायक-नायिकेच्या ‘साचेबद्ध’ कथांमधून बाहेर येऊन काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळत गेली, असे तो म्हणतो. त्याच्या मते कथा महत्त्वाची असते. कथेतून वास्तव मांडा वा काल्पनिक विषय मांडा… तुम्ही त्यातून प्रेक्षकांना काय सांगू पाहता हे महत्त्वाचे आहे. अनेकदा गोष्टी जशा आहेत तशा त्या लोकांसमोर मांडल्या तर त्यांना त्या माहितीपूर्ण आणि मनोरंजकही वाटतात, असा आपला अनुभव असल्याचे तो सांगतो.

शरद केळकरच्या आवाजालाही गेल्या काही दिवसांत एक वलय प्राप्त झाले आहे. त्याचा आवाज विशेषत: तरुणाईला जास्त भावतो. माझ्यासाठी आवाजाची जादू वगैरे असे काही नाही. तो त्यासाठी खूप मेहनत घेतो आहे किंवा आवाज वेगळा काढतो आहे, असेही काही नसल्याचे त्याने स्पष्ट केले. बोलताना किंवा संवाद म्हणताना अगदी स्पष्ट भाषेत ते असावेत. तसेच आपल्या आवाजातून समोरच्याला आपुलकी वाटावी इतक्या सहज पद्धतीनेच आपल्या आवाजाचा वापर करत असल्याचेही त्याने सांगितले. माझाही आवाज इतरांसारखाच आहे, मी काही फार भारदस्त बोलतो असे नाही. पण नक्कीच ‘केस फाइल्स’ या मालिकेतून मला अधिकाधिक लोकांपर्यंत अभिनयापेक्षा आवाजाच्या माध्यमातून पोहोचता येणार आहे, असे तो म्हणतो.  गेल्या दीड वर्षाच्या काळात त्याने काही चांगल्या मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या असून लवकरच पुढच्या वर्षी एकापाठोपाठ एक चित्रपट प्रेक्षकांसमोर येतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.