प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नत यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ३१ मे रात्री ११ वाजताच्या आसपास केके यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आणि संपूर्ण मनोरंजनसृष्टीला हादरा बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अभिनेता अक्षय कुमार, रश्मी देसाई, गायक राहुल वैद्य, आणि स्वरा भास्कर यांच्यासह अनेक कलाकारांनी केके यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

केके यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरीही प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू कार्डियक अरेस्टमुळे झाल्याचं बोललं जात आहे. केके ज्यावेळी कोलकाता येथील एका कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना स्ट्रोक आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मात्र केके यांचा मृत्यू कसा झाला यावर डॉक्टरांनी अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार पोस्टमॉर्टमनंतर यामागचं कारण स्पष्ट होऊ शकेल.

‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार, केके यांना ३१ मे रात्री १०.३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी ते दक्षिण कोलकाताच्या Nazrul Mancha नावाच्या एका ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करत होते. लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. केके दोन दिवस कोलकातामध्ये परफॉर्म करणार होते. त्याआधी ३० मे रोजी त्यांचा आणखी एक कॉन्सर्ट शो झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५३ वर्षीय गायक केके यांनी १९९६ साली ‘माचिस’ चित्रपटाच्या ‘छोड आए हम वो गलियाँ’ या गाण्यापासून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानी ‘तड़प तड़पके’, ‘बर्दाश्त नहीं कर सकता’, ‘दस बहाने’, ‘आंखों में तेरी’, ‘तू ही मेरी शब है’, ‘खुदा जाने’ आणि ‘जिंदगी दो पल की’ यांसारखी बरीच हिट गाणी दिली. प्रसिद्ध गायक किशोर कुमार हे केके यांचं प्रेरणास्थान होते. विशेष म्हणजे केके यांनी संगीताचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं. मात्र तरीही त्यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.