करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाउन करण्यात आलं आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या वर्गाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसंच खबरदारीच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. या २१ दिवसांमध्ये देशात अनेक मोठ-मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरिज  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने नव्या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ही सीरिज ती स्टोरी टेलिंगसारखी व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

ताहिराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ती लॉकडाउनवर आधारित वेब सीरिजची निर्मित करत असल्याचं सांगितलं. ‘द लॉकडाउन टेल्स’, असं ताहिराच्या नव्या सीरिजचं नाव असून देशातील लॉकडाउनच्या काळामधील परिस्थितीचं चित्रण या सीरिजमध्ये करण्यात येणार आहे.

या सीरिजमधील ‘6 फीट दूर’ या पहिला भागाचं ताहिराने कथन केलं आहे. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.  ताहिरा एक उत्तम लेखिका असून तिने दिग्दर्शन केलेली ‘पिन्नी’ ही शॉर्ट फिल्म अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री नीना गुप्ता झळकल्या आहेत.