अमेय वाघ हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो नेहमीच हटके कथानक असलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. काही वर्षांपासून तो मोठ्या पडद्यावर सातत्यानं सक्रिय असल्याचं दिसतं. पण, अमेयला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून.
या मालिकेत त्यानं साकारलेल्या कैवल्यच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. पण, यानंतर अमेय मालिकांमध्ये फारसा दिसला नाही. परंतु, आता अमेय वाघ पुन्हा टेलिव्हिजनवर परतला आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचं तो सूत्रसंचालन करताना दिसतो. अमेयसह या कार्यक्रमात मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळत आहेत. कलाकारांसह इन्फ्लुएन्सरही या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
अशातच नुकतीच अमेयने ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कार्यक्रमातील अभिनेता व इन्फ्लुएन्सर जोडीचा गमतीशीर किस्सा सांगितलं आहे. ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातील सदस्यांबद्दल बोलताना तो म्हणाला, “गौतमी पाटील व हेमंत ढोमे ही एक जोडी होती. गौतमीला आपण भारी डान्स करताना पाहिलं आहे आणि तिच्या कार्यक्रमांनाही लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तर, हेमंत हा एक चांगला दिग्दर्शक व अभिनेता आहे. त्यामुळे या दोघांना बघितल्यानंतर साधारण आपल्याला असं वाटतं की, गौतमीला स्वयंपाक येत असावा आणि हेमंतला काही येत नसेल; पण याच्या अगदी विरुद्ध चित्र मी पाहिलं. हेमंतला सगळा स्वयंपाक येतो आणि गौतमीला काहीही येत नाही.”
“मी गौतमीला विचारलं तुला काय येतं? ती म्हणाली, “मला नुडल्ससुद्धा करता येत नाहीत. म्हणून हेमंतदादा जे सांगतील, तेच मी आता ऐकणार आहे.” पण, आम्ही म्हटलं, असं नाही चालणार. कारण- स्वयंपाकघरात काम करणं सोपं नसतं. एका वेळी अनेक कामं करायची असतात. त्यामुळे आम्ही त्या दोघांना एक छोटंसं स्किट सादर करायला सांगितलं आणि त्यांनी खूप अप्रतिम स्किट सादर केलं. पण, हे सगळं करत असताना त्यांनी जेवणही बनवलं.”
या मुलाखतीदरम्यान, अमेयला मुलाखतकाराने मग गौतमी भाकरी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायची; ते काय होतं, असं विचारलं. त्यावेळी अमेय म्हणाला, “मला असं वाटतं की, ते व्हिडीओ तिने असेच टाकले असावेत”. त्यामुळे अमेयने गौतमीची पोलखोलच केली आहे.