टेलीव्हिजनवरील लोकप्रिय जोडपे अली गोनी आणि जास्मीन भसीन अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. ‘बिग बॉस’ १४ मध्ये दोघांची ओळख झाली आणि त्यांचं रिलेशनशिप सुरु झालं. काही वर्षांच्या डेटिंगनंतर दोघं लिव्ह-इनमध्ये राहायला लागले आहेत, याबद्दल स्वत: जास्मीनने माहिती दिली होती. दोघेही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतात. अली आणि जास्मीनला अनेकदा धर्मावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यावर जास्मीनने उत्तर दिलं आहे.
‘स्क्रीन’च्या ‘डियर मी…’ या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात जास्मीनने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘बिग बॉस १४’च्या आधी जास्मीन आणि अलीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता याबद्दल ती म्हणाली, “अली आणि मी मित्र म्हणून भेटलो होतो, नंतर ‘बिग बॉस’ शो झाला. तेव्हा मी शोमध्ये जाणार होते आणि त्याआधी आम्ही चर्चा केली की, एकत्र राहणे हा आमच्यासाठी पर्याय नाही. मग अली शोमध्ये आला आणि म्हणाला, ‘आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया’. आम्ही कायमच एकमेकांच्या प्रेमात होतो; पण आम्ही फक्त नकार देत होतो.”
यापुढे तिने सांगितले, “आम्ही खूप चांगले मित्र होतो. पण नंतर आम्ही ठरवले की, आयुष्यात पुढे जाण्यासाठी थोडं अंतर महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांचं जोडीदार म्हणून एकत्र भविष्य नसेल, तर एकमेकांना दुखावण्यात आणि नातेसंबंधात अडकण्यात काय अर्थ होता? त्यामुळे दोघांत छान मैत्री असणे चांगले होते. आम्ही नात्यात घेतलेल्या थोड्या वेळच्या अंतरामध्ये अलीला जाणवलं की, तो आमच्या नात्यासाठी पुन्हा प्रयत्न करु इच्छितो.”
यापुढे जास्मीनने अलीबरोबरच्या नात्याबद्दल आणि धर्मावरुन ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल असं म्हटलं, “हे नाते आमच्या दोघांमध्ये आहे. आमच्यात एक समजूतदारपणा आहे. आमच्यात याविषयी बोलणं झालं आहे. आम्ही जसे आहोत तसे एकमेकांना स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला कोणाचंही मत महत्त्वाचं नाही. आमच्या नात्याबद्दल जर लोक नकारात्मक मतं व्यक्त करत असतील, तर त्यांना लाज वाटली पाहिजे.”
यापुढे तिने म्हटलं, “जगाला प्रेम आणि सकारात्मक असण्याची गरज आहे. जर दोन लोक आनंदी असतील, तर इतर मूर्ख लोकांनी त्यांची मतं स्वतःकडेच ठेवावीत आणि जर ते इतके हुशार असतील तर त्यांनी स्वतःचे जीवन व्यवस्थित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.” दरम्यान, दोघांच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर अली ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये दिसत आहे; तर जास्मीन ‘द ट्रेटर्स’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.