Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत काव्याने पार्थच्या अपरोक्ष वकिलांना फोन करून घटस्फोट घेण्यासंदर्भात चर्चा केल्याचं नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळालं. मनाविरुद्ध झालेल्या लग्नामुळे काव्या प्रचंड वैतागलेली असते. मात्र, पार्थ प्रत्येक गोष्टीत तिला साथ देण्याचा, तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतो.

जीवा आणि नंदिनीच्या नात्यात देखील असंच काहीसं सुरू आहे. जीवा आणि काव्याचं आधीपासून अफेअर असल्याची कल्पना कोणालाच नसते. काव्या सगळ्या आधीच्या गोष्टी विसरून जीवाबरोबरचं नातं संपवण्याचं निर्णय घेते आणि जीवा याचा सगळा राग नंदिनीवर काढतो. या सगळ्याचा तिला प्रचंड त्रास होऊन दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतो.

जीवा आणि काव्याने ब्रेकअप केल्यामुळे आता हळुहळू दोघंही नियतीने झालेलं अरेंज मॅरेज स्वीकारतील असा अंदाज बांधला जात होता. पण, आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काहीतरी भलतंच घडणार आहे.

काव्याने वकिलांना परस्पर फोन करून घटस्फोट घेण्यासंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती पार्थला मिळते. तो घरी येऊन काव्याला या सगळ्याचा जाब विचारतो आणि यापुढे तुम्हाला माझा आणि या लग्नाचा त्रास होणार नाही असंही तिला सांगतो. हीच गोष्ट त्यांच्या घटस्फोटाचं कारण ठरणार आहे. दुसरीकडे, नंदिनी सुद्धा असाच निर्णय घेते.

आता पार्थ आणि नंदिनी दोघंही जीवा-काव्याला नात्यातून मुक्त होण्यासाठी घटस्फोटाचे पेपर्स देणार आहेत. पार्थ काव्याला सांगतो, “आज मी कायमची तुमची सुटका करतोय” तर, नंदिनी जीवाला म्हणते, “यापुढे तुम्हाला आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही कारण, आज हे सिद्ध झालं लग्नानंतर प्रेम होत नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनीचं नातं मोडेल का? घटस्फोटाबाबत या जोडप्यांमध्ये काय निर्णय होईल? हे या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते.