Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या काव्या जीवाला ( जन्मेजय ) पुन्हा तिच्या आयुष्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काव्या आणि जीवाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. मात्र, वसु आत्या आणि रम्याच्या क्रूर प्लॅनमुळे नंदिनी-पार्थचं लग्न मोडतं. ऐनवेळी काव्याचं पार्थशी लग्न होतं.
तर, दुसरीकडे सामाजिक दबावामुळे जीवा नंदिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. लग्नानंतर काव्या प्रचंड अस्वस्थ असते. तिला पहिल्या दिवसापासून पार्थशी घटस्फोट घेऊन जीवाबरोबर संसार थाटायचा असतो. पण, घरच्यांच्या दबावापुढे तिला काहीच करता येत नाही.
याशिवाय जीवा देखील नंदिनीबरोबर झालेलं लग्न निभावण्याचा निर्णय घेतो. यामुळे काव्या हतबल होते, या सगळ्या गोष्टी तिला खटकतात आणि ती एक मोठा प्लॅन बनवते.
नंदिनी आणि पार्थसमोर काहीही करून जीवा आणि तिचं नातं उघड करायचं असं काव्या ठरवते. पण, घडतं काहीतरी वेगळंच…काव्याने खोलीत लावलेले त्यांच्या नात्याविषयीचे पुरावे आधीच कोणीतरी नष्ट केलेले असतात. काव्याचे सगळे प्लॅन फसतात आणि नंदिनीसमोर काहीही उघड होत नाही.
अखेर आता काव्या आणि जीवामध्ये मोठा वाद निर्माण होणार आहे. काव्या त्याला म्हणते, “जीवा सांगून टाकूया सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल…” यावर जीवा म्हणतो, “नंदिनीचा लग्नावरचा, माझ्यावरचा विश्वास उडेल असं मी काहीही करणार नाहीये.” एवढं बोलून जीवा काव्यासमोरून निघून जात असतो पण, काव्या त्याला अडवून विचारते, “सगळं लपवशील पण या टॅटूचं काय करशील? तो कसा लपवशील?”
यानंतर संतापलेला जीवा मोठा निर्णय घेणार आहे. ते दोघंही शेकोटीजवळ उभे असतात. जीवा वैतागून जळत्या कोळशाच्या साहाय्याने हा टॅटू मिटवणार आहे. जीवा वेदनेने जोरात किंचाळतो, इतक्यात नंदिनी धावतपळत या दोघांच्या दिशेने येते. जीवाला पाहून ती सुद्धा मोठ्याने आक्रोश करते. तर, काव्याला देखील जीवाची ही भयंकर कृती पाहून धक्का बसतो.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत जीवाने टॅटू मिटवल्याने काव्या आणि त्याचं नातं आता कायमचं संपणार आहे. त्यामुळे येत्या काळात मालिकेत काय घडणार? जीवाने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाचा काय परिणाम होणार? नंदिनी याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहणार याचा उलगडा येत्या आठवड्यात होणार आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा प्रोमो
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते.