‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. मालिका बंद होऊन साडे चार वर्षांहून अधिक काळ झाला असला तरी अजूनही मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार सध्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे. काही कलाकार ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दिसत आहे. नितीश चव्हाण व्यतिरिक्त ‘टॅलेंट’ म्हणजे अभिनेता महेश जाधव ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत झळकला आहे. या मालिकेत त्याने काजूची भूमिका साकारली आहे. याच काजूने म्हणजेच महेश जाधवने स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. याचा खुलासा अभिनेता किरण गायकवाडने केला आहे.

गेल्यावर्षी अभिनेता महेश जाधवने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. महेशने फलटणमध्ये स्वतःचा फूड ट्रक सुरू केला होता. ‘हॅलो शॉरमा’, असं फूड ट्रकचं नाव आहे. ११ जानेवारी २०२४पासून अभिनेत्याने मित्राच्या साथीने या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता महेशने स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. यानिमित्ताने ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील भैय्यासाहेब म्हणजे किरण गायकवाडने सोशल मीडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण गायकवाडने इन्स्टाग्राम स्टोरीवर महेश जाधवचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “घर स्वतःचं आणि मालकी हक्काचं.” किरणने शेअर केलेल्या फोटोमध्ये महेश हातात नेमप्लेट घेऊन उभा असलेला पाहायला मिळत आहे. महेशच्या नव्या घराच्या नेमप्लेटवर श्री स्वामी समर्थ…श्री महेश जाधव, ४०३ असं लिहिण्यात आलं आहे. किरणच्या पोस्टनंतर आता महेशचा मित्र परिवार सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
किरण गायकवाड इन्स्टाग्राम स्टोरी
किरण गायकवाड इन्स्टाग्राम स्टोरी
महेश जाधव इन्स्टाग्राम स्टोरी
महेश जाधव इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, महेश जाधवच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘लागिरं झालं जी’नंतर तो अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळाला. तसंच त्याने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमामध्ये काम केलं. शिवाय तो ‘फकाट’ या चित्रपटातही झळकला. त्याने आपल्या अभिनयाची छाप मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत उमटवली आहे. गेल्यावर्षी रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हाच्या ‘काकुट’ हिंदी चित्रपटात महेशने काम केलं होतं. आता तो ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. महेश सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या सेटवरील रील व्हिडीओ शेअर करत असतो.