‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सर्वत्र लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हे सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवातीनिमित्त निखिल बनेने एक नवीन सुरुवात केली आहे. त्याने स्वत: एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितले आहे.
निखिल बने हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या मित्रांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने नवीन काही वस्तू खरेदी केल्याचेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन
“एका नव्या वाटचालीची सुरुवात करतोय, एडिटिंग शिकण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन pc setup घेतला. आशिर्वाद राहुद्या.. खूप खूप धन्यवाद तुषार… तुझ्यामुळे शक्य झालंय हे”, असे निखिल बनेने म्हटले आहे.
याचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. त्यात तो म्हणाला, “मला कॉलेजपासूनच एडिटिंग, फोटोशॉप हे शिकण्याची आवड होती. पण ते कधीही शिकता आलं नाही. पण आता स्वत:चे युट्यूब चॅनल सुरु केलंय, त्यानिमित्ताने ते नक्कीच शिकता येईल आणि घरात एक कॉम्प्युटर देखील येईल. मला त्यावर एडिटिंग, प्रिमिअर प्रो, आफ्टर इफेक्टस अशा बऱ्याच गोष्टी शिकता येतील.”
आणखी वाचा : “माणसाच्या भावना बोथट होतायत का?” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान छोट्या पडद्यावरुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून निखिल बनेला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी निखिल बने आणि ‘चला हवा येऊ द्या’ या फेम अभिनेत्री स्नेहल शिदम या दोघांनी एक गोड फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे तो चर्चेत होता. मात्र त्यानंतर त्याने यावर स्पष्टीकरण दिले होते.