Marathi Actress Childhood Photo : आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
आता अशाच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सर्वत्र चर्चेत आला आहे. या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेमध्ये काम केलेलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…
‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेत काम करून ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. इन्स्टाग्रामच्या ‘आस्क मी सेशन’ दरम्यान एका चाहत्याने या अभिनेत्रीला बालपणीचा आवडता फोटो शेअर करण्यास सांगितलं होतं. यानंतर अभिनेत्रीने तिच्या बालपणीच्या क्युट फोटोची झलक सर्वांना दाखवली. या फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या बाहुलीला मांडीवर बसवून खेळवत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
“मी आणि माझी बाहुली मिनू” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बालपणी गुलाबी रंगाची साडी नेसून सुंदर फोटो काढणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. पण, ही चिमुकली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री वल्लरी विराज आहे.
अभिनेत्री वल्लरी विराजने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी तिने सगळ्याच चाहत्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीने याच सेशनदरम्यान चाहत्यांना तिच्या बालपणीची झलक दाखवली आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या ‘झी मराठी’च्या मालिकेत वल्लरी विराजने प्रमुख भूमिका साकारली होती.

वल्लरीच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जवळपास वर्षभर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर या मालिकेने नुकताच सर्वांचा निरोप घेतला. आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेनंतर वल्लरी विराज पुन्हा कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.