Vallari Viraj and Aalapini shares Video: अभिनेत्री वल्लरी विराज सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे मोठ्या चर्चेत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली आहे.

वल्लरी विराजने या मालिकेत लीला ही भूमिका साकारली आहे. गोंधळ घालणारी, उत्साही, सर्वांची मने जिंकणारी, प्रेमळ स्वभावाने सर्वांना आपलेसे करणारी लीला प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. एजेवर असणारे तिचे प्रेम, बहिणीची काळजी, आजी व तिच्यातील नाते यामुळे लीला प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. एजे व लीलाची केमिस्ट्रीदेखील लक्ष वेधून घेताना दिसते, त्यामुळे वल्लरीचे लीला हे पात्र लोकप्रिय ठरले आहे.

अभिनेत्रींनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

अभिनेत्री अनेकदा तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे तर चर्चेत येते, मात्र अनेकदा ती तिच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंमुळेदेखील चर्चेत येते. सोशल मीडियावर वल्लरी सेटवरील व्हिडीओ, डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या व्हिडीओंना प्रेक्षक दादही देतात. आता वल्लरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सहअभिनेत्री आलापिनीबरोबर दिसत आहे.

वल्लरी व आलापिनीने या व्हिडीओमध्ये अनुप्रास अलंकाराची उदाहरणे दिली आहेत. २९ व्यंजनांचे अनुप्रास अलंकार त्यांनी सादर केले आहेत. त्यांनी क, ख अशी अक्षरे घेऊन अनेक उदाहरणे दिली आहेत. आता या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामान्य प्रेक्षकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सहअभिनेत्री शर्मिला शिंदेने लिहिले, “बापरे! तुम्ही मुलींनी कमाल केली”, अभिनेत्री ऋता दुर्गुळेने ‘क्रेझी’ असे लिहिले. मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी लिहिले, “काय करू तुमचं मुलींनो, मी नि:शब्द आहे, मला तुमचा अभिमान वाटतो, अप्रतिम. खूप प्रेम”, अशी कमेंट करीत शीतल क्षीरसागर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्रियदर्शिनी इंदालकरने, “हे किती कमाल आहे”, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या भारती पाटील यांनी लिहिले, “कौतुकास्पद आहे. वल्लरी आणि आलापिनी दोघीही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आहेत, पण मातृभाषेला आपल्या आईप्रमाणे जपतात. खरंय, ज्याने आपली मायबोली जपली, त्याने आपली माय जपली”, अभिनेत्री शिवानी नाईकने, “आहा, कमाल”, अशी कमेंट केली आहे. ऋजुता देशमुख यांनी लिहिले, “अगं, किती गोड, खूप मजा आली.”

तर चाहत्यांनीदेखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “हे सादरीकरण करणे हा मुळातच कसला कमाल विचार आहे”, “कमाल कमाल”, “ऐकूनच दम लागला, एकदम भारी”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, मालिकेत सध्या एजेची पहिली पत्नी अंतरा परत आली आहे, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.