Eijaz Khan admits he quit TV too soon: ‘अदृश्यम- द इनव्हिजिबल हिरोज’, ‘काव्यांजली’,’सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘पुनर्विवाह-एक नयी उम्मीद’, ‘भ्रम’ अशा मालिका आणि वेब सीरिज यांसाठी अभिनेता एजाज खान ओळखला जातो. त्याने काही बॉलीवूड चित्रपटांतही काम केले आहे.
एजाज खान टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. त्याने विविध भूमिका साकारत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. एक काळ असा होता, ज्यावेळी तो लोकप्रियतेच्या शिखरावर होता. २००३ ते २००८ या दरम्यान अभिनेत्याने टीव्ही मालिकांत विविध भूमिका साकारत त्याचा चाहतावर्ग निर्माण केला. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने टीव्हीवर काम न करण्याचा निर्णय घेतला. आता एका मुलाखतीत अभिनेत्याने यावर वक्तव्य केले आहे.
“टेलिव्हिजनवर काम करणे थांबवून…”
एजाज खानने नुकताच ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधला. गाजलेल्या चित्रपटांत काम करूनही तो इंडस्ट्रीमध्ये अजूनही स्वत:ची जागा निर्माण करत असल्याचे त्याने म्हटले. तसेच, खूप लवकर मालिकांमध्ये काम करणे सोडून कदाचित चूक केल्याचे वक्तव्य एजाजने केले. अभिनेता म्हणाला, “मला वाटते की, आयुष्यात असे काही क्षण आले, जेव्हा मला वाटले की, कदाचित २००८ मध्ये यशाच्या शिखरावर असताना टेलिव्हिजनवर काम कऱणे थांबवून मी चूक केली. मी आणखी चार घरे बांधू शकलो असतो. आर्थिकदृष्ट्या आणखी थोडा सक्षम झालो असतो.”
काही भूमिका कामाची, पैशांची गरज होती म्हणून साकारल्याचे कबूल करीत एजाज खान म्हणाला “हो, मी काही वेळा फक्त पैशांची गरज होती म्हणून काम केले आहे; पण कलेशी तडजोड करावी लागू नये, याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. एक काळ असा होता की, उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मी एकाच वेळी अनेक शोमध्ये काम करत होतो. त्यानंतर मी जास्त काम करण्यापेक्षा, कमी पण चांगल्या भूमिका साकारण्यास सुरूवात केली.”
अभिनेता पुढे म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये पुढची वाटचाल कशी असेल याबाबत अनिश्चितता आहे. कार्यक्रमांना हजर असणे किंवा नसणे हे ठरवता येते. पण, तुम्हाला लोक विसरु शकतात, हा धोका पत्करावा लागतो.” अभिनेता असेही म्हणाला की चाहते मला अनेकदा सांगतात की, त्यांना मला विविध भूमिकांमध्ये पाहायचे आहे.
दरम्यान, एजाज खान हा ‘बिग बॉस १४’मध्ये देखील दिसला होता. अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठा आहे.