Premachi Goshta Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचं शूटिंग पार पडलं. यावेळी सगळेच कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी हे खलनायिकेचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मालिका संपताना इन्स्टाग्रामवर शूटिंगच्या आठवणी, सेटवरचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २ वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता, यादरम्यान अनेक अडचणी आल्या पण, यातच आमची खरी परीक्षा होती असं अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

अपूर्वा लिहिते, “प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झालं. खरंतर, कसं व्यक्त होऊ हे कळत नाहीये…कारण, माझ्या मनात आता असंख्य भावना दाटून आल्या आहेत. जवळजवळ दोन वर्षांचा हा प्रवास होता. अनेक आव्हानं, नव्या गोष्टी शिकण्याची संधी आणि आयुष्यात आलेल्या सुंदर अनुभवांनी परिपूर्ण असा हा प्रवास होता. शेवंताची भूमिका ते सावनी…हा प्रवास एक अभिनेत्री म्हणून देखील खूप काही शिकवून गेला.”

हा २ वर्षांचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आम्ही सुद्धा कठीण काळ अनुभवला आहे. पात्र बदलली, काही कलाकार मध्येच सोडून केले, सतत होणारे बदल या सगळ्या परिस्थितीत आम्ही खचलो नाही. ती आमची एकप्रकारे परीक्षाच होती. पण, काहीही झालं तरी, काम करतानाचा उत्साह, धमाल, मजा या सगळ्या गोष्टींमध्ये कोणतीच कमी भासणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आपल्या कामाप्रती असलेली कमिटमेंट सर्वात महत्त्वाची असते. एक कलाकार म्हणून आपल्या संपूर्ण टीमच्या साथीने उभं राहणं खूप महत्त्वाचं असतं.

मी जाणीवपूर्वक सावनीची भूमिका स्वीकारली होती कारण, मला नकारात्मक पात्र साकारण्याचा अनुभव घ्यायचा होता जेणेकरून माझ्या कामात नवीन रंगछटा जोडता येतील, स्वत:ला नवीन आव्हानं देता येतील. सावनीचा लूक, तिचे दागिने, तिचे संवाद आणि तिची देहबोली मी सगळं काही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि या पात्राला पडद्यावर जिवंत केलं.

सावनीला या पात्राला टीकेचा सामना सुद्धा करावा लागला कारण, नकारात्मक पात्रावर जेव्हा टीका होते, तेव्हाच तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती मिळते. या पात्रासाठी मला ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’, ‘द मोस्ट ग्लॅमरस फेस ऑफ द इयर २०२४’ असे पुरस्कार देखील मिळाले. पण, तुम्हा सर्वांचं प्रेम हे मला मिळालेलं सर्वात मोठं बक्षीस होतं.

‘शशी-सुमीत प्रोडक्शन’, ‘स्टार प्रवाह’ आमची संपूर्ण टीम, आमच्या मालिकेची क्रिएटिव्ह टीम, लेखक, माझे सहकलाकार, माझ्यावर विश्वास ठेवणारे, माझ्या पाठिशी उभे राहणारे…आणि सावनीला घडवण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते. या मालिकेचा निरोप घेणं हे सोपं नाहीये. पण, म्हणतात ना…काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी तुम्हाला आधीचं काहीतरी संपवावं लागतं. तसंच काहीसं झालंय…मी लवकरच एका नवीन पात्रासह, एका नवीन कथेसह तुम्हा सर्वांच्या भेटीला येईल…सावनी तुमचा निरोप घेतेय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अपूर्वाचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच तिचे चाहते लवकरच अपूर्वाला नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता ‘प्रेमाची गोष्ट’ऐवजी ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.