अभिनेत्री तितीक्षा तावडे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आहे. ‘सरस्वती’ या मालिकेतून ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. यानंतर तिने ‘तू अशी जवळी राहा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. तर काही दिवसांपूर्वीच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपल्यानंतर तितीक्षा गेल्या काही दिवसांपासून तिच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे.
यादरम्यान तितीक्षा सोशल मीडियामार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते; तर ती तिच्या व्लॉगच्या माध्यमातूनही याबाबतच्या अपडेट देत असते. नुकतीच ती तिच्या सासरी म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या घरी नाशिकला गेली आहे. यावेळी तिने तेथील व्लॉग शेअर केले आहेत. नाशिकमध्ये सिद्धार्थचे आई-बाबा, मावशी-काका व त्यांच्या दोन मुली असं कुटुंब आहे. तितीक्षा अनेकदा व्लॉगमार्फत त्यांच्याबद्दल सांगत असते. सिद्धार्थला दोन मावस बहिणी आहेत. त्यातील एका बहिणीने सिद्धार्थ व तितीक्षा यांना एक खास गोष्ट भेट म्हणून दिली आहे.
सिद्धार्थच्या बहिणीने याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थची बहीण लिप्पन आर्टिस्ट आहे. ( लिप्पन म्हणजे एक पारंपरिक भित्तीचित्र कला) तिने लिप्पनपासून बनवलेलं सुंदर भित्तीचित्र तिच्या दादा-वहिनीला भेट म्हणून दिलं आहे. तिच्या या कलेचं व सर्जनशीलतेचं तिच्या कुटुंबीयांकडून कौतुक होत आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला ही खास गोष्ट त्यांना भेट म्हणून दिली. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, “दादा वहिनीच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांना काही तरी खास भेट द्यायची होती. दादा आणि वहिनीला याबद्दल जरासुद्धा कल्पना नव्हती.”
अभिनेता सिद्धार्थ बोडके व तितीक्षा तावडे या दोघांनी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न केलं होतं. त्यांचा हा प्रेमविवाह होता. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे, बरीच वर्षे ते एकमेकांचे चांगले मित्र होते, नंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तर लग्न करण्यापूर्वी दोघे लिव्ह इनमध्येही राहात होते. लग्न करण्यापूर्वी सिद्धार्थने तितीक्षाला हटके अंदाजात प्रपोजही केलं होतं. सिद्धार्थ व तितीक्षा मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडींपैकी एक आहेत.