महाराष्ट्रातील सर्वांत मोठं भक्तिपर्व म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. ही केवळ यात्रा नसून ती एक अध्यात्मिक साधना आहे. पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर विशेष कार्यक्रम प्रसारित केला जात आहे ज्याचं नाव आहे ‘माऊली महाराष्ट्राची’.
महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर या कार्यक्रमाचं निवेदन करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही पंढरीची वारी प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवण्याची संधी मिळत आहे. आदेश बांदेकरांसह ‘स्टार प्रवाह’च्या विविध मालिकांमध्ये काम करणारे अनेक कलाकार देखील या वारीत सहभागी होऊन हा अद्भूत सोहळा अनुभवत आहेत.
‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील ईश्वरी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग नुकतीच या वारीत सहभागी झाली. ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवेघाट ते सासवड या मार्गावर तिने या वारीत सहभाग घेतला होता. शर्वरीने वारकऱ्यांसाठी खास भाकऱ्या बनवल्या.
या अनुभवाविषयी सांगताना शर्वरी म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वारी अनुभवली. अत्यंत भारावून टाकणारा अनुभव होता. सासवड ते दिवेघाट हा प्रवास पायी केला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. आजूबाजूचा हा उत्साह पाहून माझ्यातही नवी ऊर्जा संचारत होती. यानिमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. वारकरी विसाव्यासाठी जिथे थांबतात तिथे मला जाता आलं. हरीपाठ ऐकायला मिळाला आणि या विलक्षण सुखावणाऱ्या वातावरणात मी सगळ्यांसाठी काही भाकऱ्या बनवल्या. हा अनुभव शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण एक नवी अनुभूती मिळाली आहे मी हेच सांगू शकेन.”
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘माऊली महाराष्ट्राची’ हा विशेष कार्यक्रम २३ जूनपासून रोज संध्याकाळी ६ वाजचा प्रसारित केला जातो.