Tharala Tar Mag Fame Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ही सिरियल टीआरपीमध्ये देखील कायम अग्रेसर असते. या मालिकेतील सगळेच कलाकार गेल्या अडीच वर्षात घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. यापैकी अर्जुनच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच अस्मिताची भूमिका साकारणाऱ्या मोनिका दबाडेने काही महिन्यांपूर्वीच ती आई होणार असल्याची गूडन्यूज प्रेक्षकांना दिली होती. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ‘ठरलं तर मग’ मालिकेतून मोनिकाने काही महिन्यांसाठी ब्रेक घेतला.
यानंतर १५ मार्च २०२५ रोजी मोनिकाला मुलगी झाली. अभिनेत्रीने लेकीचं नाव वृंदा असं ठेवलं आहे. मध्यंतरी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी मोनिकासाठी लेकीच्या जन्मानंतर खास लाडू बनवून पाठवले होते. आता त्यांच्या पाठोपाठ मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरीने सुद्धा वृंदाला खास गिफ्ट दिलं आहे. याची झलक मोनिकाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये दाखवली आहे.
मोनिका, तिचा पती चिन्मय आणि चिमुकली वृंदा असे तिघेजण आज गाडीतून फिरायला गेले होते. यावेळी मोनिकाने चिमुकल्या वृंदाला बेबी कार सीटमध्ये झोपवलं होतं. या बेबी कारसीटमुळे लहान बाळासह गाडीतून प्रवास करणं सोयीचं जातं. हीच बेबी कारसीट मोनिकाच्या चिमुकल्या वृंदासाठी अभिनेत्री जुई गडकरीने भेट म्हणून दिली आहे.
खरंतर, अस्मिता आणि सायलीचं मालिकेत एकमेकींशी अजिबात जमत नसतं. पण, ऑफस्क्रीन या दोघींमध्ये अतिशय सुंदर बॉण्डिंग आहे. मोनिका लिहिते, “मी अँड माय माचा… थँक्यू जुई मावशी, विशेषत: वृंदाकडून तुझे खूप-खूप आभार…कारण, या कारसीटमुळे वृंदाचा आणि तिच्या आईचा प्रवास सुखाचा व सोयीचा होईल.”
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अस्मिता तिच्या पतीकडे बाहेरगावी गेल्याचं दाखवत आहेत. मोनिकाने मध्यंतरी दिलेल्या मुलाखतीत ती लवकरच मालिकेत कमबॅक करण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. आता मोनिकाची एन्ट्री मालिकेत केव्हा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.