Ankita Lokhande & Usha Nadkarni : ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेने छोट्या पडद्यावर जवळपास पाच वर्षे अधिराज्य गाजवलं. या मालिकेची निर्मिती एकता कपूरने केली होती. १ जून २००९ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि पुढे, २०१४ मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती.

या मालिकेत अंकिता लोखंडेच्या ( अर्चना ) ऑनस्क्रीन सासूबाईंची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ( सविता ) यांनी साकारली होती. या मालिकेला नुकतीच १६ वर्षे पूर्ण झाली आहेत, यानिमित्ताने उषा नाडकर्णी अंकिता लोखंडेच्या घरी पोहोचल्या होत्या. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘पवित्र रिश्ता’ला १६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंकिता हुबेहूब मालिकेतील अर्चनाच्या भूमिकेप्रमाणे, तिच्या लूकप्रमाणे तयार झाली होती. यानंतर तिच्या घरी उषा नाडकर्णी आल्या. या दोघींनी एकत्र गप्पा मारून ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अंकिताचा पती विकी जैन आणि अभिनेत्रीची आई सुद्धा उपस्थित होती. अंकिता उषा नाडकर्णींना पाहताच म्हणाली, “माझ्या पहिल्या सासूबाई…मालिकेत सुरुवातीला यांनी अर्चनाला खूप त्रास दिला होता.” यानंतर अंकिताने प्रेमाने त्यांना जवळ घेतलं. दोघींनी एकमेकींना मिठी मारल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

उषा नाडकर्णी अंकिताला भेटून भावुक झाल्या होत्या. एवढे वर्षे त्या आपल्या भावाबरोबर राहायच्या पण, उषा यांच्या भावाचं गेल्यावर्षी निधन झालं. त्यामुळे आता घरात एकटीच राहते अशी खंत त्यांनी अंकिता व विकीसमोर व्यक्त केली. उषा नाडकर्णींना भावुक झालेलं पाहून अंकिता लगेच त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना धीर दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी विकी, अंकिता व उषा नाडकर्णी या तिघांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. अंकिता या व्हिडीओमध्ये उषा नाडकर्णींना प्रेमाने ‘आई’ म्हणत असल्याचं पाहायला मिळालं. “आईला आवडतं म्हणून सर्व झणझणीत तिखट जेवण केलं आहे” असं अंकिता यावेळी म्हणाली. तसेच ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर आम्ही दोघीही एकमेकींशी फारसं बोललो नाही. शेवटच्या दिवशी अंकिताने तिच्या रुममध्ये बोलावून घेतलं आणि यापुढे कधीही मदत लागली तर नक्की मला फोन करा असं सांगितलं होतं अशी आठवण उषा यांनी अंकिताच्या नवऱ्याला सांगितली.