‘कांटा लगा गर्ल’, बिग बॉस १३ फेम शेफाली जरीवालाने वयाच्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. २७ जून रोजी रात्री उशिरा तिच्या मृत्यूची बातमी आली. शेफालीला तिचा पती पराग त्यागी आणि इतर तीन जण मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, परंतु तिला मृत घोषित करण्यात आलं. तिच्या निधनंतर पराग हॉस्पिटलमधून घरी गेला आणि पोलीस तपासात सहकार्य केलं. दुसरीकडे पराग व शेफालीचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले.
पराग व शेफाली एकमेकांवर प्रचंड प्रेम करायचे. शेफाली नेहमी परागवरचं प्रेम व्यक्त करताना दिसायची. दोघांची प्रेमकहाणी खूप खास होती. पराग हा शेफालीचा दुसरा पती होता. शेफालीचं पहिलं लग्न Meet Brothers जोडीतील हरमीत सिंगशी झालं होतं. शेफालीने अवघ्या २२ व्या वर्षी २००४ मध्ये हरमीतशी लग्न केलं होतं, पण त्यांचं नातं फक्त ५ वर्षे टिकलं. २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर शेफालीचा प्रेमावरचा विश्वास उडाला. पुन्हा कधीच कुणावर प्रेम करू शकणार नाही, असं शेफालीला वाटायचं.
शेफालीने पहिल्या पतीवर केलेले आरोप
घटस्फोट घेताना शेफालीने हरमीतवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते. तसेच या नात्यात भावनिक आदर मिळाला नाही, ज्यामुळे मानसिक तणावाखाली असल्याचं शेफालीने म्हटलं होतं. “तुमचं कौतुक होत नसेल, आदर केला जात नसेल अशा नात्यात असणं योग्य नाही. सर्व हिंसाचार शारीरिक नसतात, मानसिक हिंसाचारही खूप होतो आणि जेव्हा तुम्ही त्या हिंसाचारात जगत असता तेव्हा खूप दुःखी असता,” असं एका मुलाखतीत शेफाली म्हणाली होती.
शेफालीच्या आयुष्यात आला पराग
शेफाली व पराग यांची भेट तिच्या एका मित्राच्या पार्टीत झाली होती. पराग ‘पवित्र रिश्ता’ करत होता, त्याचबरोबर चित्रपटांमध्येही काम करत होता. त्या पार्टीत पराग व शेफालीची मैत्री झाली होती. तिला पराग आवडला, पण तिने प्रेमात पडायचं नाही असं ठरवलं. पण परागचा स्वभाव, त्याचं काळजी घेणं सगळं शेफालीला आवडू लागलं. शेफालीच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट क्षणांमध्ये पराग खंबीरपणे तिच्या पाठिशी उभा असायचा. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
शेफालीबद्दल काय म्हणाला होता पराग?
शेफालीच्या प्रेमात पडण्याबद्दल एकदा पराग एका मुलाखतीत व्यक्त झाला होता. “शेफाली खूप प्रेमळ आहे. तिचा म्युझिक व्हिडीओ आल्यावर लोकांमध्ये तिची वेगळीच प्रतिमा तयार झाली होती. मात्र खऱ्या आयुष्यात शेफाली खूप वेगळी आहे. ती एक अशी मुलगी आहे जी पत्नी म्हणून आयुष्यात असावी असं कोणत्याही मुलाला वाटेल. ती खूप काळजी घेते. ती तिच्या आई-वडिलांवर खूप प्रेम करते, अगदी मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेते. ती माझ्या आई-वडिलांचीही खूप काळजी घेते,” असं पराग म्हणाला होता.
पराग त्यागी व शेफाली जरीवाला यांनी १२ ऑगस्ट २०१४ रोजी लग्न केलं होतं. पराग शेफालीपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे.