झी मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘चल भावा सिटीत’चा महाअंतिम सोहळा रविवारी (१ जून) रोजी दिमाखात पार पडला. या पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत पाच जोड्यांमध्ये चुरशीच्या लढत रंगली होती. शोच्या अंतिम सोहळ्यात अथर्व-रेवती, विजय-अनुश्री, ऋषिकेश-श्रुती, दिपक-प्रणाली आणि रामा-नीता या पाच जोड्या पोहोचल्या होत्या. यापैकी श्रुती राऊळ आणि ऋषिकेश चव्हाण या जोडीने बाजी मारली.
या शोच्या निमित्ताने बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता श्रेयस तळपदेने छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. ‘चल भावा सिटीत’ या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी श्रेयसवर होती आणि त्याने ही जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली. श्रेयसने आधी झी मराठीवरीलच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
‘चल भावा सिटीत’ शोची सांगता होताच श्रेयसने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. खास व्हिडीओ शेअर करत श्रेयस असं म्हणतो, “मित्रांनो अशाप्रकारे आपल्या ‘चल भावा सिटीत’ची सांगता होत आहे. ज्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, उत्कृष्ट प्रतिसाद दिला, न चुकता शो पाहिला. त्यांचे मी सर्व प्रथम आभार मानतो. तुमच्या प्रेमामुळे, पाठिंब्याने आम्हाला उत्तम काम करण्याची स्फूर्ती येते.”
यानंतर श्रेयसने असं म्हटलं, “या कार्यक्रमातून प्रत्येक जण काहीना काही शिकवण घेऊन जात आहे. ज्यात मीसुद्धा हे शिकलो की, ‘चांगले सादरीकरण करणेच असा एकच हेतू घेऊन ते साध्य करण्यासाठी मिळून काम केले तर घडणारी कलाकृती ही उत्तमच होते.’ गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि या शहरातल्या मुलींनी… प्रत्येकाने अनोखे योगदान दिले. ज्यामुळे सेटवर कायम एक नाविण्य आणि ऊर्जा टिकून राहते.”
यापुढे श्रेयसने “जाता जाता त्यांचेही आभार मानेन जे दिसत नाहीत; पण मेहनत तितकीच घेत असतात. सर्व पडद्यामागच्या कलाकारांचे ही खूप खूप आभार” असं म्हटलं आहे. तसंच पुढे श्रेयसने ‘चल भावा सिटीत’चे आणखी एक धम्माल पर्व घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला यायचे का?” असा खास प्रश्नही चाहत्यांना विचारला आहे.
श्रेयसने शेअर केलेल्या या पोस्टखाली शोमधील स्पर्धकांनी तसंच शोच्या प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘चल भावा सिटीत’ या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी जीवनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. गावाकडच्या मातीशी नाळ जोडलेली असतानाच शहरातील झगमगाटाशी जोडलेले असणे हे या शोचे मुख्य गमक होते.